Breaking News

खालापुरात कंपनीमध्ये तीन कामगार भाजले

खोपोली : प्रतिनिधी

खालापूर तालुक्यातील डोणवत येथील कार्बन स्टील मार्ट प्रा. लि या कंपनीत तीन कामगार भाजून गंभीर जखमी झाल्याची घटना घडली असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे समजते, मात्र यामागचे कारण व्यवस्थापनाकडून अधिकृत माहिती समोर न आल्याने गुलदस्त्यात आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, डोणवत येथील कार्बन स्टील मार्ट कंपनीत तीन कामगारांना बुधवारी (दि. 17) पहाटे शॉक लागल्यामुळे त्यात गंभीर जखमी झाले. रणजित शहा (26), अयोध्या यादव (40) आणि मुकेश प्रसाद (30) या तिघांना कंपनीत काम करीत असताना जोरदार विद्युत शॉक लागल्यामुळे त्यांच्या हातापायाला इजा झाली. कंपनी प्रशासनाकडून खालापूर येथील 108 रुग्णवाहिकेला बोलावण्यात आले असता डॉ. कपिल पवार यांनी जखमी कामगारांवर प्राथमिक उपचार करून त्यांना खोपोलीतील नगर परिषद दवाखान्यात दाखल केले व त्यानंतर अधिक उपचारासाठी कळंबोली येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

कंपनी व्यवस्थापन जेव्हा कंपनी चालवत असते, तेव्हा कंपनीच्या भवितव्याबाबत जेवढ्या गांभीर्याने लक्ष देऊन विचार करीत असते, तेवढाच विचार आपल्या कंपनीचा नावलौकिक व उत्पन्न वाढवण्यासाठी मेहनत घेत असलेल्या कामगारांच्या सुरक्षेचाही करणे गरजेचे आहे. झालेल्या घटनेत तीन जण गंभीर जखमी झाले असून, सुदैवाने जीवितहानी झाली नाही. सुरक्षा साधनांच्या अभावामुळे आणि निष्काळजीपणामुळे निष्पाप व्यक्तींचा प्राण जात जाता वाचला. प्राथमिक माहितीनुसार कामगार शॉक लागल्यामुळे भाजले असल्याचे सांगितले जात असले तरी याबाबत व्यवस्थापनाकडून कोणतीच माहिती समोर येत नसल्याने या घटनेचे कारण गुलदस्त्यातच आहे.

खालापूर तालुक्याला औद्योगिकरणाचे वरदान लाभले असून, तालुक्यात असंख्य छोट्या-मोठ्या कंपन्या आहेत. या कंपन्यांमध्ये तालुक्यातील व बाहेरील हजारो कामगार काम करतात, परंतु सुरक्षा साधनांचा अभाव, तसेच कंपनी व्यवस्थापनाचा बेफिकीरपणा कामगारांच्या जीवावर बेतत असल्याच्या घटना सातत्याने घडत असल्याचे दिसून येत आहे.

Check Also

महिंद्रा शोरूमला लागलेल्या आगीत पाच गाड्या जाळून खाक; लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान

पनवेल: वार्ताहर पनवेल जवळील कोळखे येथील महिंद्राच्या शोरूमला आग लागल्याची भीषण घटना गुरुवारी (दि. 20) …

Leave a Reply