महापालिका आयुक्तांचा निर्णय
मुंबई ः प्रतिनिधी
मागील काही दिवसांपासून मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागला आहे. रुग्णसंख्या वाढत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून बृह्नमुंबई महापालिकेने आपल्या हद्दीतील शाळा 31 डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेचे आयुक्त इक्बाल चहल यांनी या संदर्भातील आदेश काढला आहे. त्यामुळे आता मुंबईतील शाळा नव्या वर्षातच उघडणार आहेत.
मुंबईसह राज्यातील जनजीवन पूर्वपदावर येत असताना रस्त्यांवर गर्दीही वाढत आहे. त्यामुळे कोरोना प्रसाराचा धोका वाढला असून, दिवसागणिक रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर बृह्नमुंबई महापालिकेने आपल्या हद्दीतील सर्व खासगी, सरकारी, महापालिकेच्या शाळा 31 डिसेंबरपर्यंत बंदच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे येत्या सोमवारपासून राज्यातील इतर भागांमधील नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू होणार असले, तरी मुंबईतील शाळा बंदच राहणार आहेत.