Breaking News

ही तर केवळ सुरुवात आहे

शेकापचे नेते विधान परिषद सदस्य जयंत पाटील यांनी अलिबागमधील पत्रकार हर्षद कशाळकर यांना रायगड लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी सुरू असताना केलेली मारहाण सध्या संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय बनला आहे. 23 मे 2019 रोजी जिल्हा क्रीडासंकुल नहुली तालुका – अलिबाग येथे संपन्न झाली. या मतमोजणीच्या  वृत्तसंकलनासाठी उपस्थित असलेले हर्षद प्रकाश कशाळकर यांना शेकापचे आमदार जयंत पाटील, आमदार पंडित पाटील व त्यांच्या सोबत असलेल्या काही लोकांनी मतमोजणी केंद्राच्या आवारात बेकायदा घुसून मारहाण केली. या घटनेचा निषेध सर्वच स्थरातून होत आहे. स्वतः हर्षद कशाळकर यांनी त्याच दिवशी निवडणूक निर्णय अधिकार्‍यांकडे लेखी तक्रार केली. मारहाण प्रकरणी अलिबाग पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी दिलेल्या आदेशानुसार मतमोजणी केंद्रात बेकायदा घुसल्या प्रकरणी पोलिसांनी आमदार जयंत पाटील तसेच इतर तीन आमदारांविरोधात गुन्हा नोंदविला आहे. आता हे प्रकरण न्यायालात जाईल. या न्यायालयीन प्रक्रियेत किती दिवस जातील, त्याच पुढे काय होईल? न्यायालय जो काय निर्णय द्यायचाय तो देईल. परंतु पुढे काय?

खरंतर आमदार जयंत पाटील यांनी पत्रकारांना धमकावण्याची किंवा मारहाण करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी पत्रकारांना मारहाण, जिवे मारण्याची धमकी, शिवीगाळ केली आहे. आता सध्या जी पिढी अलिबागमध्ये पत्रकारिता करीत आहे त्यापैकी बहुतांश पत्रकारांना जयंत पाटील यांनी अपमानित केले आहे. त्यामुळे आमदार जयंत पाटील यांच्या बद्दल पत्रकारांमध्ये नाराजी आहेच. निवडणूक आयोगाची परवानगी नसताना 23 मे रोजी त्यांनी पत्रकाराला मारहाणच केली. या पूर्वी पत्रकारांना मारहाण केली तेव्हा पत्रकार गप्प बसले. यावेळी तसे घडले नही. संपूर्ण राज्यातून जयंत पाटील यांचा निषेध करण्यात आला. त्या शिवाय रायगड जिल्ह्यातील पत्रकार आमदार जयंत पाटील यांच्या विरोधात अलिबागमध्ये रस्त्यावर उतरले.

आमदार जयंत पाटील हे शेका पक्षाचे प्रमुख आहेत. तीन वेळा ते विधान परिषदेवर निवडून आले आहेत. ते वरिष्ठ सभागृहाचे सदस्य आहेत. त्यामुळे त्यांनी प्रगल्भपणे वागायला हवे. आपल्या पदाची प्रतिष्ठ जपायला हवी. परंतु, तसे होत नाही. कार्यकर्ते सोबत असले आणि अलिबामधील पत्रकार समोर दिसला की, त्याचे स्वागत आरडाओरड्यानेच करायचे ही आमदार जयंत पाटील यांची पध्दत आहे. म्हणजे कार्यकर्त्यांना देखील वाटते वा भाई पत्रकारांना ओरडले (कार्यकर्त्यांत वेगळा शब्द वापरतात). अनेक वेळा या बाबतीत त्यांच्या जवळच्या लोकांकडे पत्रकारांनी चर्चा केली. तुमच्या भाईंना समजवा, असा निरोप दिला.  त्यांच्या सुनबाईंना सांगितले. आमदार जयंत पाटील बदलतील, असे वाटत होते. परंतु, त्यांचा मूळ स्वभाव काय जात नाही. एक-दोन वेळा कुणूही गप्प बसतो. परंतु वारंवार होत असेल तर कुणीच गप्प बसणार नाही. अगदी आपली मुलं देखील खपवून घेत नाहीत.

आमदार जयंत पाटील यांच्या विरूध्द जिल्ह्यातील पत्रकारांमध्ये नाराजी होतीच. ती व्यक्त करण्याची संधी सर्व पत्रकार शोधत होते. त्यामुळे अलिबागमधील मोर्चात जिल्ह्यातील पत्रकार मोठ्याप्रमाणावर सहभागी झाले. मोर्चा कुणी काढला, कोणत्या संघटनेने काढला? हे कुणीच पाहिले नाही. आमदार जयंत पाटील यांच्या विरूध्द मोर्चा निघतो, हे महत्त्वाचे होते. आमदार जयंत पाटील यांच्यावर व्यक्तीशः असेलेला राग व्यक्त करण्यासाठी त्यांचा निषेध करण्यासाठीच या मोर्चात जिल्ह्यातील पत्रकार सहभागी झाले होते. ही सुरुवात आहे. यातून आमदार जयंत पाटील काही बोध घेतील आणि या पुढे तरी असे प्रकार त्यांच्या हातून घडणार नाहीत, अशी अपेक्षा करायला हरकत नही. ज्यांला मारहाण झाली त्या पत्रकाराने लेखी तक्रार दिली. पत्रकारांनी मोर्चा काढला. परंतु प्रशासन काय कारतंय? मतमोजणी प्रक्रिया पूर्ण झालेली नसताना मतमोजणी केंद्रात घुसून या प्रक्रियेत अडथळा आणण्याचा प्रयत्न केल्याबद्दल आमदार जयंत पाटील, पंडित पाटील तसेच त्यांच्या सोबत आलेल्या लोकांनी हंगामा केला तरी प्रशासन गप्प आहे. या लोकांविरूध्द कलम 353 अन्वये गुन्हा दाखल करायला हवा होता, तो केला जात नाही. त्यामुळे प्रशासनाच्या भूमिकेबद्दल शंका वाटते. हे लोक बेकायदा मतमोजणी केंद्रात घुसले परंतु त्यांनी पत्रकारांवर हल्ला केला नसता आणि पत्रकारांनी तक्रार केली नसती तर प्रशासनाने यांच्या विरोधात गुन्हे नोंदविलेच नसते. प्रशासनाने बघ्याचीच भूमिका घेतली असती. जे लोक बेकायदा मतमोजणी केंद्रात घुसलेत त्यांच्या विरूध्द स्वतः प्रशासन काय करणार? हा प्रश्न आहे. यापुढे प्रशासनाची भूमिका महत्त्वाची राहणार आहे.  मतमोजणी केंद्रात बेकायादा घुसून देखील जर या प्रकरणातील आरोपी सहीसलामत सुटले तर सर्वसामान्य जनतेमध्ये चुकीचा संदेश जाईल. त्यामुळे या प्रकरणत  जे कोणी दोशी आहेत त्यांना शिक्षा झालीच पाहिजे.

-प्रकाश सोनवडेकर

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply