गेले आठ महिने कोरोना विषाणूचे दुष्परिणाम आपण सारेच भोगत आहोत. महत्प्रयासाने ही साथ आटोक्यात आणण्यामध्ये आपल्याला यश मिळाले. अर्थात या यशाचे सारे श्रेय डॉक्टर्स, नर्सेस, वॉर्डबॉईज, सफाई कामगार, स्मशानभूमीचे कर्मचारी आणि पोलिसांना द्यायला हवे. या कोविड योद्ध्यांनी केलेल्या अतुलनीय कार्यामुळेच या भीषण साथीला अटकाव करण्यात यश मिळाले आहे. अर्थात संकट अजून पुरते टळलेले नाही. विषाणू बराचसा गेला असला तरी त्याचे शेपूट उरलेच आहे. ते वळवळणारे शेपूटच जाता जाता तडाखा देणार, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
देशभरातून गुरुवारी 46 हजार 260 नव्या कोरोना केसेसची नोंद झाली. गेल्या आठ दिवसांतला हा सर्वात मोठा आकडा आहे. चाचण्या वाढल्यामुळे हा आकडा वाढला हे खरे असले तरी याच दिवशी नोंदली गेलेली देशभरातील कोरोना मृत्यूंची संख्या 589 इतकी होती आणि ही संख्याही गेल्या 14 दिवसांतली सर्वाधिक आहे हे लक्षात घ्यायला हवे. आता एकूण कोरोना रुग्णांचा 90 लाख हा आकडा पार करणारा भारत हा अमेरिकेपाठोपाठचा दुसरा देश ठरला आहे. अर्थात 80 लाख ते 90 लाख दरम्यानची रुग्णसंख्या वाढ तुलनेने खूपच सावकाश झाली. या वाढीला 22 दिवस लागले. देशातील रुग्णवाढीचा वेग मंदावला हे दिलासादायक आहे. परंतु हा दिलासा कायम राखायचा असल्यास खबरदारी घेणे भाग आहे. गुरुवारी महाराष्ट्रभरात तसेच मुंबईतही रुग्णसंख्येत मोठी वाढ दिसून आली. राज्यभरात 5535 नवे रुग्ण नोंदले गेले, तर मुंबईत 924 नवे रुग्ण. गेल्या 15 दिवसांत राज्यात प्रथमच एका दिवसाची रुग्णसंख्या 5500च्या पुढे नोंदली गेली. राज्यातील कोरोना मृत्यूंमध्येही वाढ दिसून आली. गुरुवारी राज्यात 154 मृत्यू नोंदले गेले. मुंबईत मात्र मृत्यूंची संख्या आणखी कमी झाली. या दिवशी मुंबईत 12 मृत्यू नोंदले गेले. राज्यातील अनेक जिल्हे जिथे कोरोनाचा फैलाव तुलनेने बर्याच कालांतराने पोहचला, तिथे आता दैनंदिन पॉझिटिव्ह केसेसचे प्रमाण बरेच जास्त दिसून येते आहे. राज्याचा पॉझिटिव्हिटी रेट आठ टक्क्यांवर घसरलेला असताना या जिल्ह्यांमधील पॉझिटिव्हिटी रेट 15 ते 19 टक्के दिसतो आहे. यापैकी अनेक जिल्ह्यांमध्ये आदिवासी लोकसंख्येचे प्रमाण अधिक आहे. चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, अहमदनगर, लातूर आणि नंदुरबार येथील पॉझिटिव्हिटी रेट हा राज्याच्या दरापेक्षा अधिक आहे. उघडपणे आजारी दिसणार्या किंवा गंभीररित्या आजारी व्यक्तींचीच कोरोना चाचणी केली जात असावी असेही वाढीव पॉझिटिव्हिटी रेटमागील कारण असू शकते. या जिल्ह्यांमध्ये चाचण्यांचे जाळे अधिक विस्तारण्याची गरज आहे. गेल्या काही दिवसांत राजधानी दिल्लीमध्ये कोरोनाचा फैलाव वेगाने वाढताना दिसतो आहे. त्यामुळे दिल्लीहून येणार्या रेल्वेगाड्या व हवाई वाहतुकीवर तात्पुरते निर्बंध लागू करण्याचा विचार राज्य सरकार करते आहे. मेच्या अखेरीपासून देशांतर्गत विमानसेवा सुरू झाली. पाठोपाठ विमानतळांवरील क्वारंटाइन उपाययोजनाही एव्हाना बर्याच शिथिल झाल्या आहेत. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी गुजरात सरकारनेही अहमदाबाद पाठोपाठ आता राजकोट, सुरत आणि बडोदे येथे रात्रीची संचारबंदी लागू केली आहे. देशभरातील एकंदर चित्र पाहता खबरदारी घेणे थांबवणे कुणालाच परवडणारे नाही हे गांभीर्याने लक्षात घेण्याची गरज आहे.