Breaking News

महाडमध्ये कोरोनाचा विसर; मंत्र्यांच्या उपस्थितीत गर्दी आणि धक्काबुक्की

महाड ः प्रतिनिधी

महाड नगर परिषदेच्या नवीन प्रशासकीय भवनाचा लोकार्पण सोहळा शनिवारी (दि. 16) पार पाडला. या वेळी झालेली गर्दी आणि धक्काबुक्की पाहता पालिकेलाच कोरोनाचा विसर पडल्याचे पहावयास मिळाले. दरम्यान, या सोहळ्यास आलेल्या तीन मंत्र्यांनी महाडकरांना केवळ दिवाळीच्या कोरड्या शुभेच्छा, तर तटकरेंना कानपिचक्या दिल्या. महाड पालिकेचे छत्रपती शिवाजी महाराज नवीन प्रशासकीय भवन आणि संत रोहिदास सभागृह यांचे लोकार्पण राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते झाले. या सोहळ्यास नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, जिल्ह्याच्या पालकमंत्री अदिती तटकरे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, खासदार सुनील तटकरे, आमदार भरत गोगावले, नगराध्यक्ष स्नेहल जगताप, शोभा सावंत, जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर आदी उपस्थित होते. यानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकात झालेल्या सभेत थोरात यांनी, काँग्रेसमधून तटकरेंना राष्ट्रवादीने पळवले, असा चिमटा काढला. या वेळी त्यांनी सी. डी. देशमुखांची आठवण करून दिली तसेच आघाडी सरकारने शेतकर्‍यांची कर्जमाफी केली, पण कोकणासाठी नाही, असा खुलासाही केला. एकनाथ शिंदे यांनी महाडमधील इमारतींसाठी स्टील कंपल्सरी करणार, असे सांगून स्थानिक बिल्डरांची झोप उडवली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी तटकरेंना बजावत स्नेहलला सांभाळून घ्या, असा सल्ला दिला तसेच तटकरेंच्या पळवापळवीला उत्तर देताना पळवापळवी झाली, हिशोब बरोबर करायला हवा, असे म्हटले. त्याचबरोबर आमदार गोगावलेंचे शिक्षण कमी, पण बोलतात जास्त, असा टोला हाणला. खासदार तटकरे म्हणाले की, माणिरावांनी माझी माणसं पळवली, पण कविस्करांसाठी मी फील्डींग लावली आहे. मी केले नाही तरी दोष माझ्यावर येतो. माझ्या बोलण्याने प्रत्येकाच्या मनात शंका येते. सगळ्यांना संशय की, गोगावलेंचे आणि माझे काहीतरी गॅटमॅट आहे. पालकमंत्री आदिती तटकरे यांनी स्नेहल जगताप यांच्या कार्याला शुभेच्छा दिल्या, तर गोगावलेंनी सरसकट मदत देण्याची याचना आपल्याच सरकारकडे केली तसेच पालिका निवडणुकीत महाडची आघाडी तटकरे ठरवणार, असा गौप्यस्फोट केला. नगराध्यक्ष जगताप यांनी माणिकरावांचे स्वप्न पूर्ण करणार असल्याचे सांगितले.

Check Also

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाजे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाजे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ग्रामविकास निधीमधून नव्याने बांधण्यात …

Leave a Reply