Breaking News

लसीच्या प्रतीक्षेत विश्व

कोरोना विषाणूला अटकाव करणारी प्रभावी लस आता आपल्याला प्रत्यक्षात दिली कधी जाते याकडे अवघे जग तूर्तास डोळे लावून बसले आहे. विशेष आनंदाची बाब म्हणजे वैज्ञानिकांनी याबाबतदेखील जगाचा हिरमोड केलेला नाही. कोरोना विषाणूची पहिली केस चीनमध्ये साधारण वर्षभरापूर्वी आढळली. त्यानंतर जवळपास 12-13 महिन्यांच्या आत जगभरातील किमान तीन डझन लशी यशस्वी वाटचाल करताना दिसत आहेत.

जगभरात सध्या बहुचर्चित असलेल्या कोरोना प्रतिबंधक लशींपैकी सर्वात आघाडीवर आहे ऑक्सफर्ड विद्यापीठ-अ‍ॅस्ट्राझेनेका यांच्या संयुक्त प्रयत्नांनी निर्माण झालेली कोविशिल्ड ही लस. या लशीची यशस्विता जवळपास 90 टक्के असल्याचे सांगितले जाते. या लशीच्या संशोधन-उत्पादनामध्येे भारताचा वाटा सिंहाचा आहे. कारण पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट या कंपनीने ऑक्सफर्ड-अ‍ॅस्ट्राझेनेकासोबत भागीदारी केली आहे. या लसीचे उत्पादन सीरम इन्स्टिट्यूट करणार असून एव्हाना सुमारे चार कोटी डोस तयार देखील झाले आहेत. अन्य लशींच्या तुलनेत या लशीची विश्वासार्हता अधिक आहे, कारण ती यापूर्वी वापरल्या गेलेल्या पद्धतीने तयार करण्यात आली आहे. अगदी प्रत्येकाला लस द्यावी लागणार असल्याने लसींच्या वितरणाचा प्रश्न अवघ्या जगासमोर आहे. लसींचे वितरण कसे करावे, लसींच्या कुप्यांचा साठा कुठे आणि कसा करावा, त्यासाठी लागणार्‍या शीतगृहांचे जाळे कसे उभे करावे, याबाबत आपले केंद्र सरकार अहोरात्र विचारमंथन करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: लक्ष घालून या लसीच्या उत्पादनाच्या प्रगतीचा वेळोवेळी आढावा घेतला आहे. आता एकंदर तीन लसींच्या चाचण्या अंतिम टप्प्यात आल्या आहेत. पंतप्रधान मोदी शंभर देशांच्या राजदूतांसमवेत पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटला भेट देणार आहेत. विविध लसींचे उत्पादन भारतात वर्षानुवर्षे होत आले आहे. किंबहुना, आपला देश लस उत्पादनामध्ये जगातील आघाडीवरचा देश मानला जातो. कोविड-19ला अटकाव करणार्‍या लसीच्या उत्पादनात आणि वितरणात भारत आघाडीवर असेल, अशी चिन्हे स्पष्ट दिसू लागली आहेत. अर्थात या सार्‍या वेगवान प्रगतीचे श्रेय शास्त्रज्ञांना आणि पंतप्रधान मोदी यांच्या द्रष्टेपणालाच द्यावे लागेल. अन्यथा या विक्रमी कालखंडात हे यश मिळूच शकले नसते. तसे पाहू गेल्यास रशियाने देखील काही महिन्यांपूर्वीच कोरोना प्रतिबंधक लस शोधल्याचे जाहीर केले होते. अन्य अनेक औषधकंपन्या लस संशोधनात दुसर्‍या वा तिसर्‍या टप्प्यात आहेत. येत्या तीन-चार महिन्यांमध्ये यापैकी किमान चार ते पाच लसी वापरासाठी उपलब्ध होतील असा अंदाज आहे. भारतासारख्या प्रचंड लोकसंख्या असलेल्या विशाल देशात प्रत्येकाला लस टोचणे हे एक मोठेच आव्हान आहे. पंतप्रधान मोदी यांनी प्रत्येक भारतीय नागरिकाला लस मिळेलच याची खात्री दिली आहे. त्यांच्या शब्दावर अवघा भारत देश निर्धास्तपणे विसंबून असतो हे आजवर सार्‍या जगाने पाहिले आहे. पंतप्रधान मोदी आपला शब्द सार्थ ठरवतील यात शंकाच नाही. कोरोना प्रतिबंधक लशीच्या वितरणाच्या कामात राज्यांची भूमिका महत्त्वाची राहील. तेव्हा राज्य सरकारांनी आपापल्या यंत्रणा सज्ज ठेवाव्यात व त्याचा तपशील पंतप्रधान कार्यालयाकडे पाठवावा अशा सूचना पंतप्रधानांनी दिल्या आहेत. त्यानुसार काही राज्यांनी आपापली कृती दले व कृती कार्यक्रम तयार देखील केल्याचे समजते. महाराष्ट्र या कामी तरी मागे राहणार नाही एवढीच अपेक्षा आहे.

Check Also

केळवणे येथे आमदार महेश बालदींच्या प्रचाराचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष केळवणे येथे उरण मतदार संघाचे दमदार आमदार महेश …

Leave a Reply