Breaking News

सिडको मलनिस्सारण केंद्रातून पुनर्प्रक्रिया केलेले पाणी तळोजा औद्योगिक क्षेत्राला पुरविण्याचे नियोजन प्रस्तावित

 पिण्यायोग्य पाण्याची होणार बचत

नवी मुंबई ः सिडको वृत्तसेवा

सिडकोच्या नवी मुंबईतील कळंबोली येथील नियोजित मलनिस्सारण पुनर्प्रक्रिया केंद्रातून 30

दशलक्ष लिटर पाणी तळोजा औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांना पुरविण्याचे नियोजन सिडकोतर्फे प्रस्तावित आहे. त्यामुळे तितक्याच प्रमाणात पिण्यायोग्य अशा स्वच्छ पाण्याची बचत होणार आहे.

सिडकोचे कळंबोली येथे 50 द. ल. लिटर क्षमतेचे मलनिस्सारण केंद्र कार्यान्वित असून या केंद्रातून दररोज किमान 20 ते 25 द. ल. लिटर सांडपाणी गोळा करून त्यावर प्रक्रिया केली जाते. तसेच कामोठे येथील मलनिस्सारण केंद्रामध्ये दररोज कमीत कमी 20 ते 25 द. ल. लिटर सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाते.

कळंबोली आणि कामोठे येथील मलनिस्सारण केंद्रांमधून अंदाजे 45 द. ल. लिटर सांडपाणी हे कळंबोली येथील नियोजित मलनिस्सारण पुनर्प्रक्रिया केंद्र (टी. टी. पी.) येथे गोळा केले जाणार आहे. त्यानंतर पुनर्प्रक्रिया केंद्रामध्ये 41 द. ल. लिटर पाण्यावर पुनर्प्रक्रिया केली जाऊन त्याद्वारे मिळणारे 30 द. ल. लिटर पाणी पुनर्वापरासाठी तळोजा औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांना पुरविले जाणार आहे. सर्वत्र जगभर पाण्याचा पुनर्वापर करण्यावर भर दिला जात असताना अशा प्रकारे सांडपाण्यावर पुनर्प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करण्यासाठी सिडकोतर्फे करण्यात येणारे प्रयत्न हे पाणी बचत व पर्यावरणाच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणारे आहेत, असे मत सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांनी व्यक्त केले.

सदर मलनिस्सारण पुनर्प्रक्रिया प्रकल्पासाठी होणारा अंदाजित खर्च काढण्यासाठी सिडकोतर्फे तांत्रिक सल्लागार नेमण्यात आला असून या सल्लागाराने व्यवहार्यता अहवाल सादर केला आहे. यामध्ये कळंबोली मलनिस्सारण केंद्राचे अपग्रेडेशन, नवीन मलनिस्सारण पुनर्प्रक्रिया केंद्र बांधण्यासाठी येणार खर्च, मलनिस्सारण पुनर्प्रक्रिया केंद्रापासून तळोजा औद्योगिक क्षेत्रापर्यंत पाणी वाहून नेण्यासाठी जलवाहिन्या टाकण्याचा खर्च, पुढील 20 वर्षे देखभाल व दुरुस्तीचा खर्च, पनवेल महानगरपालिकेला द्यावे लागणारे शुल्क व इतर प्रशासकीय खर्च याबद्दलच्या व्यवहार्यतेची तपासणी केली आहे. सदर मलनिस्सारण पुनर्प्रक्रिया केंद्र सन 2021 या वर्षात विकसित करण्याचे नियोजित आहे, असे सिडको प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.

Check Also

पनवेल महापालिकेच्या विविध विकासकामांचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते भूमिपूजन

पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका महाराष्ट्र राज्य, देश अशा सर्व स्तरावर पुढे जाण्यासाठी आगेकूच …

Leave a Reply