Breaking News

हिंदुत्वाची नवी ऊर्मी

याआधी काँग्रेसच्या प्रवक्त्या म्हणून गाजलेल्या प्रियंका चतुर्वेदी यांनीदेखील खासदारकी न मिळाल्यामुळे काँग्रेसला रामराम करून तडक शिवसेनेत प्रवेश केला होता. शिवसेनेने त्यांना कबूल केल्याप्रमाणे खासदारकी बहाल केली. दक्षिणेतील खुशबू सुंदर या अभिनेत्रीचा प्रवासदेखील अशाच प्रकारे डाव्या विचारसरणीकडून उजव्या विचारसरणीकडे झाला आहे. प्रियंका

चतुर्वेदी यांनीदेखील खासदारकी न मिळाल्यामुळे फार काळ वाट न पाहता, विचारसरणीचा बाऊ न करता मनगटावर शिवबंधन बांधून घेतले. उर्मिला मातोंडकर यांनीदेखील विधान परिषदेतील आमदारकी मिळणार हे नक्की झाल्यावरच शिवसेनेत वाजतगाजत प्रवेश केला आहे. लोकांनी लोकांसाठी लोकांकरवी चालवलेली राजकीय व्यवस्था म्हणजे लोकशाही अशी एक सर्वमान्य व्याख्या आहे. परंतु या लोकशाही व्यवस्थेमध्ये काही अनिष्ट पायंडे मात्र पडत जातात. त्याला कारणीभूत असतो राजकीय पक्षांचा लोकप्रियतेचा हव्यास. या व्यवस्थेमध्ये आपण समाजाच्या उपयोगी पडावयास आलो आहोत, सत्तेच्या खुर्च्या उबवण्यासाठी नव्हे हा मूलभूत विचारच मागे पडतो. मग सुरू होते ती लोकप्रियतेसाठीची चढाओढ. याचे ताजे उदाहरण म्हणून प्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांच्या शिवसेनाप्रवेशाकडे बोट दाखवावे लागेल. रंगीला-गर्ल म्हणून रुपेरी पडद्यावर गाजलेल्या या अभिनेत्रीने दीड वर्षापूर्वीच सक्रिय राजकारणात प्रवेश केला. समाजवादी विचारसरणीशी जवळीक असलेल्या घरात जन्मलेल्या मातोंडकर यांनी काँग्रेसला जवळचे मानले हे समजण्याजोगे होते. गतवर्षीच्या लोकसभा निवडणुकीत उत्तर मुंबई मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर त्यांनी निवडणूक लढवली होती. भारतीय जनता पक्षाचे उमेदवार गोपाळ शेट्टी यांनी त्यांचा दणदणीत पराभव केला होता. पराभवानंतर काँग्रेस पक्षातील सावळ्यागोंधळाला दूषणे देत मातोंडकर यांनी सरळ त्या पक्षाला सोडचिठ्ठी दिली. काँग्रेस पक्ष मला अतिशय निकटचा आहे आणि येथे राहून मी दीर्घकाळ समाजसेवा करणार आहे. त्यासाठीच मी राजकारणात आले असून निवडणूक हे फक्त निमित्त आहे अशा आशयाची डायलॉगबाजी मातोंडकर यांनी प्रचारसभांमध्ये केली होती, ती लोक विसरलेले नाहीत. परंतु निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतर त्यांना लागलीच काँग्रेसमधील अनागोंदीचा साक्षात्कार झाला आणि तडकाफडकी त्यांनी त्या पक्षाचे सदस्यत्व सोडले. सुमारे महिनाभरापूर्वी विधानपरिषदेतील राज्यपालनियुक्त सदस्यांच्या यादीत शिवसेनेतर्फे उर्मिला मातोंडकर यांच्या नावाची शिफारस झाल्याचे समोर आले, तेव्हाच ही अभिनेत्री शिवसेनेच्या छावणीत सामील होणार हे कळून चुकले होते. यापूर्वी डाव्या विचारसरणीला अनुसरून हिंदुत्व, भाजप आणि शिवसेनेवर यथेच्छ तोंडसुख घेतल्यानंतर मातोंडकर यांनी आता आपण जन्माने आणि कर्माने हिंदूच आहोत, अशी ग्वाही दिली. त्यामुळे अनेकांना हसू आले असेल. आपला हिंदुत्वाचा अभ्यास दांडगा असून आपण कोणाशीही खुली चर्चा करावयास तयार असल्याचे जाहीर आव्हानही त्यांनी दिले. हे सारे वाटते तितके आश्चर्यकारक नाही. डावी विचारसरणी असणारे किंवा सेक्युलर असल्याचा आविर्भाव दाखवणारे बरेच जण गेल्या सात-आठ वर्षांत आपणही हिंदूच आहोत, असे छातीठोकपणे सांगू लागले आहेत. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी हेदेखील आपण जानवेधारी ब्राह्मण आहोत असे सांगू लागले. भारतीय जनता पक्षाच्या जबरदस्त वर्चस्वामुळे हिंदुत्वाची ही नवी उर्मी तथाकथित सेक्युलर राजकारण्यांमध्ये दिसू लागली आहे हे नि:संशय पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या आक्रमक व आधुनिक भाजपचे यश आहे.

Check Also

जाहीर धुव्वा

विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन शुक्रवारी संपले. या संपूर्ण अधिवेशनाच्या काळात विरोधी पक्षाचे नेते पूर्णत: निष्प्रभ झालेले …

Leave a Reply