Breaking News

पनवेल रेल्वेस्थानकालगतचे डम्पिंग ग्राऊंड स्थलांतरित करा; भाजप शहराध्यक्ष जयंत पगडे यांची मागणी

पनवेल : रामप्रहर वृत्त

पनवेल रेल्वेस्थानकालगत व निवासी इमारतींच्या परिसरात पनवेल महापालिकेमार्फत तयार केलेले डम्पिंग ग्राऊंड आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे पालिका प्रशासनाने हे डम्पिंग ग्राऊंड लवकरात लवकर बंद करून दुसरीकडे हलवावे, अशी मागणी भाजपचे शहर मंडल अध्यक्ष जयंत पगडे यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी पालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांना निवेदन दिले आहे. पगडे यांनी निवेदनात म्हटले आहे की, प्रभाग 20 मधील पनवेल रेल्वेस्थानकालगत माझगाव डॉक गृहनिर्माण प्रकल्प, कोनार्क हेरीटाईझ, चॅनेल इलजन्सी, नव-रेसीडेन्सी, राजतारा संकुल, पर्ल होम्स, तेजस्विनी इनक्लिव्ह, तेजस्विनी आर्केड या निवासी सोसायट्यांच्या अगदी जवळ म्हणजे नागरी वस्तीमध्ये कचरा वाहतूक ठेकेदार साईगणेश एन्टरप्राईझेस हे आपल्या छोट्या घंटागाडीमार्फत शहरातील जमा केलेला दैनंदिन ओला व सुका कचरा मोकळ्या मैदानात दररोज टाकत आहे. हा ठेकेदार गेल्या चार ते पाच महिन्यांपासून मनमानी करून कचरा टाकत असल्यामुळे या भागातील नागरिक कचर्‍याच्या दुर्गंधीमुळे मोठ्या प्रमाणात आजारी पडत आहेत व त्रस्त झाले आहेत. ठेकेदारामार्फत दैनंदिन गोळा होणार्‍या कचर्‍याचे प्रमाण खूप मोठे असून, त्याच्यावर महापालिका आरोग्य प्रशासनाचे कोणतेही नियंत्रण नाही. या डम्पिंग ग्राऊंडच्या बाजूच्या महानगरपालिकेचे डी. पी. स्क्रीममधील 60 फुटी रस्ते असून रस्त्यांवरून रोज हजारो नागरिकांची ये-जा होत असते तसेच अनेक नागरिक पनवेल रेल्वेस्थानक व एसटी बसस्टॅडकडेही जात असतात. या सर्व नागरिकांना कचर्‍यांच्या दुर्गधीमुळे नाकावर रूमाल ठेवून प्रवास करावा लागत आहे. या भागातील रहिवासी नागरिकांच्या मनात पनवेल महापालिका प्रशासनाच्या या आरोग्यविषयक गंभीर बाबीमुळे व दुर्लक्षामुळे तीव्र असंतोषाची भावना निर्माण झालेली आहे. नागरी वस्तीमध्ये अशा पद्धतीने डम्पिंग ग्राऊंड निर्माण करणे, कचरा टाकणे म्हणजे नागरिकांच्या जिवाशी खेळण्याचा दुर्भाग्यपूर्ण विषय आहे. मला मिळालेल्या माहितीप्रमाणे या जागेवर ह्या ठेकेदारास कचरा टाकण्यासाठी पनवेल महापालिकेने ही जागा नेमून दिलेली आहे. या संदर्भात ह्या भागात राहणार्‍या नागरिकांच्या अनेक तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. सर्व सोसायट्यांमधील स्थानिक रहिवासी नागरिकांच्या वतीने आपणांस विनंती आहे की, साईगणेश एन्टरप्राईझेस याने निर्माण केलेले कचरा डम्पिंग ग्राऊंड त्वरित बंद करण्यात यावे व दुसरीकडे स्थलांतरित करण्यात यावे. या संदर्भात पनवेल महानगरपालिका प्रशासनाने ताबडतोब योग्य ती कार्यवाही न केल्यास स्थानिक जनतेस सोबत घेऊन महापालिकेसमोर तीव्र आंदोलन करणेत येईल, असा मागणीवजा इशारा भाजप शहर अध्यक्ष जयंत पगडे यांनी दिला आहे. या निवेदनाची प्रत भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, महापौर डॉ. कविता चौतमोल, सभागृह नेते परेश ठाकूर यांना माहितीसाठी पाठविण्यात आली आहे.

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply