Breaking News

कर्जमाफीच्या दुसर्या यादीतही नाव न आल्याने शेतकर्याची आत्महत्या; फसव्या महाविकास आघाडीविरोधात शेतकरीवर्गात संताप

जालना : प्रतिनिधी

महाविकास आघाडी सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेच्या दुसर्‍या यादीतही नाव न आल्याने निराश होऊन जालन्यातील एका शेतकर्‍याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. गजानन पुंजाजी वाघ (वरूड बु., ता. भोकरदन) असे या दुर्दैवी शेतकर्‍याचे नाव आहे. त्यामुळे फसव्या राज्य सरकारविरोधात शेतकरीवर्गातून संताप व्यक्त होत आहे.

वाघ हे अल्पभूधारक शेतकरी होते. त्यांच्यावर महिंद्रा फायनान्स कंपनीचे दीड लाखाचे, तर महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे एक लाखाचे कर्ज होते. महाविकास आघाडी सरकारने हिवाळी अधिवेशनात शेतकर्‍यांचे दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला होता. 24 फेब्रुवारीला अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दिवशी कर्जमाफीच्या लाभार्थ्यांची पहिली यादी जाहीर झाली होती. यानंतर 29 फेब्रुवारीला कर्जमाफीच्या लाभार्थ्यांची दुसरी यादी जाहीर झाली, मात्र याही यादीत आपले नाव न आल्याने गजानन वाघ नैराश्याच्या गर्तेत ढकलले गेले आणि यातूनच त्यांनी आपली जीवनयात्रा संपविली.

गजानन वाघ हे पत्नी व आईसोबत शेतात गेले नाही. एक काम आटोपून नंतर शेतात येतो, असे सांगून त्यांनी पत्नी व आईला शेतात पाठवले. त्यानंतर मुलीलाही शाळेत जाऊ दिले आणि त्यानंतर त्यांनी घरात स्वत:ला कोंडून घेऊन गळफास घेतला. बराच आवाज देऊनही दरवाजा उघडला जात नसल्याने मुलगी व आजीने शेजार्‍यांच्या मदतीने घराचा दरवाजा तोडला असता वाघ यांचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळला. या प्रकरणी भोकरदन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे.

मी देवाघरी चाललो! परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीमुळे शेतकरी गजानन वाघ यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर होता. कर्जमाफी झाल्यावर हा बोजा कमी होईल असे वाघ यांना वाटत होते, मात्र दुसर्‍या यादीतही नाव न आल्याने ’आईला जीव लाव. मी देवाघरी चाललो,’ असे चिठ्ठीतून शाळेत जाणार्‍या लेकीला सांगत वाघ यांनी मृत्यूला कवटाळले. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

Check Also

खांदा कॉलनीतील ‘उबाठा’चे पदाधिकारी, कार्यकर्ते भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला लागलेली गळती सुरूच …

Leave a Reply