शहर होतेय बकाल, नागरिकांमध्ये संताप
पाली : प्रतिनिधी
अष्टविनायकांपैकी एक क्षेत्र असलेल्या पाली शहराला सध्या बॅनरने वेढले आहे. शहरातील विविध ठिकाणे व स्थळे या बॅनरमुळे बकाल झाली आहेत.
येथील छत्रपती शिवाजी स्मारकाच्या कंपाउंडवर लावलेल्या राजकीय पक्षाच्या बॅनरमुळे ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला. त्यानंतर हा बॅनर काढण्यात आला असला तरी शहरातील बॅनरबाजी विरोधात असंतोष पसरला आहे.
पालीतील काही राजकीय पक्ष, सामाजिक गट व संस्था, मित्र परिवार मंडळ, विविध समुदाय व त्यांच्यातील सभासद हे वाढदिवस, पद नियुक्ती शुभेच्छा, सत्कार, दुखवटा आदींचे बॅनर पाली शहरामधील मुख्य चौकात, दिशादर्शक फलकांवर, छत्रपती शिवाजी महाराज चौकात तसेच येथील कठड्यांवर लावतात. त्यामुळे हे सर्व परिसर बकाल झाले आहेत. शिवाय दिशादर्शक फलकांवरील बॅनरमुळे नवीन वाहनचालकांना रस्त्याची माहिती मिळत नाही. स्मारक परिसरातील बॅनरमुळे महापुरुषांचा अपमान होतो, तेथील पवित्र्याला बाधा पोहचते. त्यामुळे काही सुज्ञ नागरिक पाली शहरामधील चौकात व विविध ठिकाणी बॅनर लावण्यास मनाई करण्यात यावी, या संदर्भात सर्व राजकीय नेत्यांना निवेदन देणार आहेत.
पालीतील धार्मिक, ऐतिहासिक ठिकाणी आणि दिशादर्शक फलकावर कोणत्याही प्रकारचे बॅनर नसावेत. बॅनरबाजीमुळे पाली शहराच्या शोभेला गालबोट लागत आहे.
-कपिल पाटील, सामाजिक कार्यकर्ते, पाली, ता. सुधागड
बॅनर लावण्यासंदर्भात नवीन नियमावलीचे काम चालू आहे. बॅनर लावण्यासाठी योग्य ठिकाणांचा शोध घेण्यासाठी इंजिनिअरला सांगण्यात आले आहे. त्यानंतर सर्वांना नियमाने फी भरुन योग्य ठिकाणी बॅनर लावता येतील. शिवाय परिसर स्वच्छ व सुंदर राहील.
-दिलीप रायण्णावार, प्रशासक, नगरपंचायत पाली, ता. सुधागड