Breaking News

ट्रेडिंग करताय, पण त्याची मानसिकता आहे?

दीर्घकालीन गुंतवणूक की ट्रेडिंग हा शेअर बाजारात नव्याने व्यवहार करणार्‍यांच्या दृष्टीने नेहमीच संभ्रम असतो. त्यामुळे ट्रेडिंग करताना आपली मानसिकता कशी आहे आणि आपण किती जोखीम घेण्यास तयार आहोत हे फार महत्त्वाचे आहे. त्यातील ट्रेडिंगविषयी काही गोष्टी जाणून घेऊयात.

एकूणच शेअर बाजारातील सध्याची परिस्थिती पाहता एक वर्ग समाधानी आहे व एक वर्ग समाधानाच्या प्रतीक्षेत आहे, तर अजून एक खास वर्ग असा आहे की जो नेहमीच खूश असतो. त्याबाबत माझ्या एका क्लायंटचं वाक्य नेहमीचंच लक्षात राहिलंय. शेअर मार्केट में पैसा जाता भी हैं लेकीन मजा भी आता हैं… आणि हे बोलणारी व्यक्ती कोणी ऐरी-गैरी नव्हती, तर पुण्यातील कॅम्प परिसरातील एका नामवंत कन्स्ट्रक्शन समूहाचे ते सर्वेसर्वा आहेत. आता प्रश्न असा आहे की कोणत्याही गुंतवणूक प्रकारात किंवा शेअर बाजारात नफा झाल्यास लोक खूश होऊ शकतात हे स्वाभाविक आहे, परंतु नुकसान झाल्यावरदेखील वरीलप्रमाणे लोक त्यातदेखील आनंद घेतात, असं कसं? याचं सोपं उत्तर म्हणजे तशी मानसिकता व विचारधारा असणं आणि मग बाजारात मोजून मापून घेतलेली जोखीम (कॅल्क्युलेटेड रिस्क).

शेअर बाजारातून जरी प्रत्येकाची अपेक्षा पैसे कमावणं हीच असली तरी दृष्टिकोन हे भिन्न असू शकतात. मागील लेखात ज्या प्रकारे आपण पाहिलं की काही लोक गुंतवणुकीमधून व्याज, भाडं, लाभांश व भांडवलवृद्धी इ. गोष्टींची अपेक्षा ठेवत असतात, त्याचप्रमाणं अनेक लोक शेअर बाजारातून थोड्या गुंतवणुकीवर जास्त परताव्याची अपेक्षा धरत असतात, ज्यात काहीही गैर नाही. याला अनेक लोक सट्टा अथवा जुगार समजतात, परंतु सूज्ञ लोक त्यास ट्रेडिंग म्हणतात, ज्यामध्ये जोखीम असते, परंतु योग्य प्रकारे ती जोखीम हाताळल्यास प्रमाणातील नफा जास्त असू शकतो, परंतु स्वतः अभ्यास न करता टिप्सवर अथवा इतरांवर अवलंबून राहिल्यास नुकसानीची शक्यताच जास्त असू शकते. आता ट्रेडिंग हा विषय जसा बहुतेकांच्या आवडीचा आहे तशाच प्रकारे त्याची व्याप्तीदेखील मोठी असल्याने त्याबद्दल रीतसर आपण जाणून घेऊयात.

मानसिकता : गुंतवणूक (इन्व्हेस्टमेंट) व व्यापार (ट्रेडिंग) ह्या दोन्ही भिन्न बाबी आहेत. गुंतवणुकीवर पर्यायानं कमी जोखीम व त्या प्रमाणात परतावा आहे, तर व्यापारात कमी गुंतवणुकीवर जास्त परतावा मिळू शकतो, परंतु संपूर्ण गुंतवणूकदेखील गमावण्याची जोखीम असू शकते. त्यामुळे मोजून मापून जोखीम व्यवस्थापन केल्यास यावर मात करता येऊ शकते. व्यापार म्हणजे कमी गुंतवणुकीवर जास्तीत जास्त परतावा मिळवण्याचा प्रयत्न हे जरी खरं असलं तरी परताव्याचा दर हा तार्किक असावा हे सत्य प्रत्येकाने आत्मसात केलेलं दिसून येत नाही आणि म्हणूनच इंट्राडे ट्रेडिंगमधील क्लुप्त्या शिकून-शिकवून अव्वाच्या सव्वा शुल्क उकळणारेच खरा व्यापार करून नफा कमावतात. त्यामुळे जेव्हा मी विचारतो, की कोणताही व्यवसाय सुरू करताना त्यामधून किती परताव्याची अपेक्षा तुम्ही ठेवता? तेव्हा प्रत्येक जण लावलेल्या भांडवलावर प्रतिवर्षी 20 ते 50 टक्के परतावा अपेक्षित धरताना दिसतो, परंतु याच लोकांना क्लासदरम्यान परताव्याची अपेक्षा विचारल्यास रोज 5-10 टक्क्यांची भाषा करताना दिसतात आणि फसले जातात. आता शेअर बाजारात ट्रेडिंग म्हणजे व्यापार करणं म्हटल्यास त्यात स्वतःचं भांडवल आलं व त्यामागे जशी व्यवसायात असते तशी जोखीम, नफा-

नुकसानदेखील आलं. उदाहरणादाखल 1 लाख भांडवलावर अगदी 50 टक्के परताव्याची अपेक्षा गृहीत धरल्यास रोजचा परतावा केवळ 200 रुपये असल्यास वर्षाअखेरीस 50% परतावा मिळू शकतो (एका वर्षात व्यवहाराचे 252 दिवस गृहीत धरलेले आहेत) आणि 1 लाख भांडवलावर रोजचे 200 रुपये कमावणं हे तार्किकरीत्या वास्तवामध्ये शक्य असू शकतं, परंतु इथंच रोजचे 200 रुपये क्षूद्र वाटून लाभातून लोभात पडून एका झटक्यात लाखाचे बारा हजार झालेले अनुभवास येतात. ही झाली शेअर बाजारातील ट्रेडिंगबद्दलची तोंडओळख. पुढील लेखात याबद्दल अधिक खोलात जाऊन शेअर ट्रेडिंगचे विविध पैलू पाहूयात.

सुपरशेअर : अडाणी पॉवर

मागील चार आठवडे शेअर बाजार हा नवनवे उच्चांक प्रस्थापित करताना दिसून येत आहे आणि गेला आठवडादेखील काही यास अपवाद नव्हता. निफ्टी या राष्ट्रीय शेअर बाजाराच्या प्रमुख निर्देशांकाने मागील आठवड्यात 2.23 टक्क्यांची उसळी मारली, तर आशियातील सर्वांत जुन्या बाँबे स्टॉक एक्स्चेंजच्या सेन्सेक्सने 930 अंशांची झेप घेतलेली दिसून येते. कोरोनाच्या लशीवर येऊ घातलेला तोडगा व रुळावर येत असलेली देशाची अर्थव्यवस्था अशा गोष्टींमुळे गेल्या आठवड्यात तेजीला खतपाणी घातले गेले. आठवड्यादरम्यान शेअर बाजारामधील व्यवहारांवर देखरेख ठेवणार्‍या सेबीने ट्रेडिंग मार्जिन्सबाबत अनेक कडक धोरणं अवलंबिली असल्याने व त्याबाबत ठोस स्पष्टता नसल्याने बाजारात थोडी संदिग्धता होती. तरीही वाढत्या महागाईकडे कानाडोळा करून रिझर्व्ह बँकेने जैसे थे ठेवलेल्या रेपो रेटच्या दराबरोबरच एकूणच वृद्धीदराबाबत अपेक्षित सकारात्मकता दर्शवल्यामुळे शेवटच्या दिवशी बाजाराचे दोन्ही निर्देशांक आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर बंद झाले.

मागील आठवड्यातील सुपर शेअर ठरला अडाणी पॉवर. ह्या कंपनीचा शेअर एका आठवड्यात तब्ब्ल 66 टक्के वधारला. मागील वर्षात याच काळातील कंपनीचा 3.88 कोटी रुपये असलेला नफा वाढून या वर्षातील सप्टेंबर 2020 अखेरीस संपलेल्या तिमाहीत 2228 कोटी रुपयांवर पोहचलेला आहे. एकूणच देशाच्या पायाभूत सुविधेमध्ये असलेले विद्युत ऊर्जेचे महत्त्वाचे स्थान, वाहन उद्योगाचे भविष्य म्हणून पाहिले जात असलेले इलेक्ट्रिक वाहनांचे क्षेत्र आणि त्यामुळे वाढणारी विद्युत मागणी यामुळे पॉवर कंपन्यांचे शेअर्स तेजीत आहेत. कंपनीने देश उभारणीत स्वीकारलेला वाटा आणि त्या दृष्टीने 7000 मेगावॅट क्षमतेकडे टाकलेले पाऊल या कंपनीच्या प्रतिबद्धतेबद्दल बरेच काही सांगून जाते. 1 डिसेंबर रोजी 41 रुपयांवर दैनिक तक्त्यावर दिलेल्या ब्रेअकाऊंटनंतर पुढील तीनच दिवसांत आपले उद्दिष्ट गाठले आहे. तरीही ही संधी हुकलेल्यांना 54 रुपयांवर पुनर्खरेदीस संधी वाटत आहे. दीर्घकालीन उद्दिष्ट रु. 95 व रु. 121 अपेक्षित आहे.

-प्रसाद ल. भावे, (9822075888) sharpfinvestgmail.com

Check Also

पनवेलमधील विजेचा प्रश्न निकाली

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते दोन ट्रान्सफॉर्मरचे उद्घाटन पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल शहरातील छत्रपती …

Leave a Reply