पनवेल मनपा आयुक्तांना निवेदन
पनवेल : रामप्रहर वृत्त – पनवेल महानगरपालिका अखत्यारितील आद्यक्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात मराठी व्यावसायिक नाटकांच्या प्रयोगाच्या भाड्यात कोविड नियमावली लागू असेपर्यंत सवलत द्यावी, अशी मागणी मराठी नाट्य व्यावसायिक निर्माता संघाने मनपा आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याकडे केली आहे. या संदर्भात निवेदन देण्यात आले आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, राज्य शासनाने राज्यातील नाट्यगृहे, नाट्यप्रयोगांसाठी कोरोना सुरक्षा नियमावलीच्या अंतर्गत राहून खुली करण्याचा निर्णय 5 नोव्हेंबर रोजी जाहीर घेतला. कोरोना लॉकडाऊनचा नाट्यनिर्मात्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. तरीही नाट्यनिर्माते नाट्य व्यवसाय नव्याने सुरू करण्याची हिंमत बाळगून आहेत. यासाठी नाट्यनिर्मात्यांना शासकीय सहकार्याची आणि आर्थिक सहाय्याची गरज आहे. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन कोविडची नियमावली असेपर्यंत पनवेल महापालिका अखत्यारीतील फडके नाट्यगृहात मराठी व्यावसायिक नाट्यप्रयोगासाठीच्या भाड्यात सवलत द्यावी. नमूद विषयाच्या पत्रव्यवहार तसेच निर्णय बैठकीसाठी मराठी व्यावसायिक निर्माता संघ मुंबई कार्यकारिणी पदाधिकारी, पालिका मुख्यालयात प्रशासकीय अधिकार्यांसह विशेष बैठकीचे आयोजन होणार असल्यास निश्चित प्रत्यक्ष भेट देऊन संवाद साधून रंगभूमीच्या व्यत्यास पुन्हा तिसरी घंटा आपल्या मार्गदर्शनाने देण्यास तयार असेल.
कोविड नियमावली लागू असेपर्यंत फडके नाट्यगृहात मराठी व्यावसायिक नाटक प्रयोगाचे भाडे 400 रुपये तिकीट दरापर्यंत रुपये पाच हजार रुपये आकारावे. (401 रुपयांच्या पुढील तिकीट दरापासून प्रचलित नाट्यगृह भाडे आकारावे.) या विनंतीला त्वरित प्रशासकीय मान्यता मिळवून देण्यासाठी आपण सहकार्य करावे. नाट्यप्रयोगच्या काळात कोविडविषयक नियमावलीचे नाट्यनिर्माते पूर्णपणे पालन करतील याची ग्वाही या पत्राद्वारे देत आहोत, अशी विनंती मराठी नाट्य व्यावसायिक निर्माता संघाने केली आहे.
मनपा आयुक्त सुधाकर देशमुख यांना निवेदन देतेवेळी मराठी नाट्य व्यावसायिक निर्माता संघाचे अध्यक्ष संतोष काणेकर, अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या पनवेल शाखेचे उपाध्यक्ष तथा मनपा सभागृह नेते परेश ठाकूर, नगरसेविका रूचिता लोंढे, नाट्य परिषद पनवेल शाखा कार्यवाह श्यामनाथ पुंडे, गणेश जगताप उपस्थित होते. या वेळी आयुक्तांनी याकामी लक्ष देऊन मागणीच्या पूर्ततेसाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले.