राज्यात पुन्हा एकदा थंडीमुळे गारवा आला आहे. समुद्रामध्ये सातत्याने कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन त्याचे रूपांतर चक्रीवादळात होत असल्याने थंडीची कोंडी होत असल्याचे दिसून आले. दुसरीकडे वाढत्या तापमानामुळे नागरिकांना उन्हाचे चटके जाणवत होते. अखेर राज्यात थंडी परतली आहे, पण ती टिकून राहणे आवश्यक आहे. आपल्या देशात उन्हाळा, पावसाळा व हिवाळा हे तीन प्रमुख ऋतू आहेत. या ऋतूंचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. कारण ऋतूंवर पीकपाणी आणि एकूणच नागरी जीवनमान अवलंबून असते. त्यानुसार त्या त्या काळात आखणी व कार्यवाही केली जाते, मात्र गेल्या काही वर्षांपासून निसर्गाशी छेडछाड केली जात असल्याने ऋतूचक्र बिघडले आहे. त्याचा परिणाम पर्यावरणाच्या संतुलनावर होऊन अनेक समस्यांना मानवाला सामोरे जावे लागत आहे. हा जागतिक प्रश्न बनला आहे. अशातच गेल्या काही कालावधीपासून देशातील विशेषत: दक्षिण किनारट्टीवर सुरू असलेल्या चक्रीवादळांमुळे थंडीची कोंडी होताना पहावयास मिळत आहे. तसे पाहिले तर यंदा पावसाळ्यात सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली. सुरवातीची कसर वरुणराजाने उत्तरोत्तर वाटचालीत भरून काढली. परतीच्या पावसाने तर महाराष्ट्राला अक्षरश: झोडपून काढले. इतके की दुष्काळी ओळखल्या जाणार्या भागांमध्ये पूर आले. साहजिकच थंडीही जोरदार पडेल असे संकेत मिळाले होते. त्याप्रमाणे लोकंही उबदार कपडे कपाटातून बाहेर काढून तयारीत होते, पण हवामानाने कूस बदलली आणि ऐन सप्टेंबरमध्येच ऑक्टोबर हीट जाणवू लागली. त्यामुळे नागरिकांच्या अंगाची लाही लाही होऊन घामाच्या धारा लागल्या. अखेर नोव्हेंबरमध्ये पारा खाली गेला आणि थंडीने पुनरागमन केले, पण ती आल्यापावली दोन-तीन दिवसांतच गायब झाली. अशाच प्रकारे काही ठिकाणी अधूनमधून लपंडाव अनुभवायला मिळाला, मात्र थंडी काही सक्रिय झाली नाही. समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत असल्याचा हा परिणाम मानला जात आहे. सागरातील घडामोडींमुळे किनारपट्टीवर वादळे घोंघावून पावसाची बरसात झाली. काही भागांत पूरही आले. दुसरीकडे थंडी लांबली. आता पुन्हा एकदा राज्यात गारवा जाणवू लागला आहे. त्यामुळे लोक सुखावले असून, सर्वांना आता गुलाबी थंडीची प्रतीक्षा आहे. थंडीचा मोसम आल्हाददायक मानला जातो. या काळात भाज्या, फळे मुबलक प्रमाणात उपलब्ध होत असतात. हिवाळ्यात भूकही चांगली लागत असल्याने शरीर आरोग्यवर्धक राहते. व्यायामासाठीही हा कालावधी अनुकूल असतो. काही वेळा हुडहुडी भरविणारी थंडी पडत असली तरी दिवसा तापमान सर्वसाधारण असल्याने चिंता नसते. शिवाय थंडीत उबदार कपडे घालणे, शेकोटी पेटविणे, मित्रमंडळीसोबत हुरडा, पोपटीचे बेत करण्याची मजा काही औरच असते. अलिकडच्या काळात पावसाप्रमाणे थंडीचीही प्रतीक्षा करावी लागत आहे. गेल्या वर्षीदेखील चांगला पाऊस पडूनही थंडी तितकी पडली नाही. यंदा त्याची पुनरावृत्ती होते की पावसाप्रमाणेच उत्तरोत्तर थंडीचेही प्रमाण वाढत जाते हे पाहणे औत्सुक्याचे असेल. सध्या तरी थंडीची चादर पसरू लागली आहे. हवामान विभागाने नव्या कोणत्या वादळाची शक्यता व्यक्त केली नसल्याने वातावरण गारेगार राहण्याची चिन्हे आहेत, पण त्याच्याशी जुळवून घेताना काळजीही घेतली पाहिजे. कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात येत असताना आता पुन्हा संकट नको. म्हणून थंडी अनुभवा, पण जरा जपून!
Check Also
आगामी निवडणुकीतही आमदार प्रशांत ठाकूर यांना विजयी करा -दयानंद सोपटे
तळोजा ः रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातून तीन वेळा आपण आमदार प्रशांत ठाकूर यांच्यावर विश्वास …