Breaking News

रायगडात ठिकठिकाणी साखरचौथ गणपतीची प्रतिष्ठापना

पेण : प्रतिनिधी 

गणेशोत्सवाची सांगता झाल्यानंतर मंगळवारी (दि. 13) पहिल्या संकष्टी चतुर्थीला पेण तालुक्यात ठिकठिकाणी सार्वजनिक आणि घरगुती साखरचौथ गणपतींची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. पेणमध्ये मोठ्या उत्साहात साखरचौथ गणेशोत्सव साजरा करण्यात येत असून मंगळवारी सकाळी मिरवणुकीने सारखचौथ गणपतीचे आगमन होऊन विधीपूर्वक श्रींची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे मंडळातर्फे आयोजन करण्यात आले असून सर्वत्र मंगलमय असे पवित्र वातावातावरण निर्माण झाले आहे.पेण शहरात अष्टविनायक मित्रमंडळ, ओरिजनल अष्टविनायक मित्रमंडळ, प्रेमनगर मित्रमंडळ-चिंचपाडा, कवंडाळ तळ्याचा राजा, मातोश्री मित्र मंडळ, सुंदरनगर मित्रमंडळ, साई माऊली गणेशोत्सव मंडळ-नरदास चाळ, श्री गणेश उत्सव मंडळ-कोळीवाडा, महाकाली मित्रमंडळ-कासारआळी, शिक्षक सोसायटी मित्रमंडळ, चिंतामणी विश्वराज-पिंपळपाडा, जय गणेश मित्रमंडळ -बोरगाव, श्री मित्रमंडळ, न्यु यंग गणेश मंडळ, मित्रमंडळ -दामुगुडे आळी, ओम श्री मित्रमंडळ -विठ्ठल आळी, शिवसमर्थ मित्रमंडळ-आबेघर, अष्टविनायक मित्रमंडळ -गणपतीची वाडी, यंगस्टार शिवसमर्थ मित्रमंडळ -आंबेघर, अष्टविनायक मित्रमंडळ-गणपतीचीवाडी, यंगस्टार मित्रमंडळ-रामवाडी, साखरचौथ ग्रामस्थ मंडळ-इरवाडी आदी ठिकाणी सार्वजनिक मंडळासह तालुक्यात घरगुती सारखचौथ गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. त्यामध्ये पेण पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात 58 सार्वजनिक व 82 घरगुती साखरचौथ गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे.  या गणेशोत्सवानिमित्त सर्वत्र भव्य मंडपे उभारण्यात आली असून विद्युत रोषणाईसह मनमोहक अशी सजावट करण्यात आली आहे. गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची सर्वत्र रिघ लागल्याचे पहावयास मिळत आहे. सदर गणेशोत्सव शांततेने तसेच कायदा व सुव्यवस्थेचे पालन करुन साजरा करण्याचे आवाहन पेणचे पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ यांनी केले आहे.

मुरूड : यशवंतनगर नांदगाव येथील श्री छत्रपती शिवाजी नूतन हायस्कूलमध्ये मंगळवारी (दि. 13) पंचक्रोशीच्या राजाचे आगमन झाले. विद्यार्थ्यांमध्ये धार्मिक, सांस्कृतिक परंपरा जागृत ठेवण्यासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही हायस्कूलमध्ये साखरचौथ गणपती आणला आहे.

साखरचौथ गणपती पंचक्रोशीच्या राजाच्या पूजेचा मान हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक चिंतामणी जोशी यांना मिळाला. शैलेश जोशी पौराहित्य केले. या वेळी सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी यांनी महाआरती केली. या साखरचौथ गणपतीची सजावट प्रतीक पेडणेकर, अमर दरणे व संतोष बुल्लू यांनी केले आहे. तर मूर्तिकार  जितेंद्र चोरघे आहेत. गणरायासमोर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास रेखाटण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची आग्र्याहून सुटका, अफजल खानाचा वध, पावन खिंडीमधील लढाई, महाराजांचे समुद्री आरमार, जिजाऊ यांच्याकडून मिळालेली तलवार भेट हे सर्व प्रसंग चित्रांच्या माध्यमातून दाखवण्यात आले आहे.

रोहे :  तालुक्यात साखरचौथचे 22 सार्वजनिक आणि 74 खाजगी गणराय मंगळवारी विराजमान झाले आहेत. रोहा तालुक्यातील भुवनेश्वर येथील श्रीकृष्ण नगर, रोहा शहरातील धनगर आळी, अंधार आळी, वरसेसह अन्य ठिकाणी मंगळवारी साखरचौथ गणरायाचे वाजत गाजत आगमन झाले. तर तालुक्यात घरोघरी गणपती विराजमान झाले आहेत. सार्वजनिक मंडळांच्या वतीने रात्रभर भजन, किर्तन, विविध आध्यात्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. रोहा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सार्वजनिक मंडळांचे 22 तर 74 खाजगी गणराय विराजमान झाले आहेत.  रोहा पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

रेवदंडा : रेेवदंडा मित्रमंडळाच्या साखरचौथ श्री गणेशाची मंगळवारी (दि. 13) सकाळी साडेआठ वाजता थाटात प्रतिष्ठापना करण्यात आली. येथील भैरवनाथ मंदिराच्या प्रांगणात दरवर्षी रेवदंडा मित्रमंडळाच्या वतीने साखरचौथ गणेशोत्सव साजरा केला जातो. मंडळातर्फे सोमवारी (दि. 12) सायकांळी बागमळा ते रेवदंडा भैरवनाथ मंदिर अशी भव्य आगमन रॅली काढण्यात आली होती. मंगळवारी सकाळी श्रींच्या मुर्तीची प्रतिष्ठापना, पूजा व आरती करण्यात आली. त्यानंतर गणपती अथर्वशीर्ष आवर्तने, दुपारी महिला मंडळ नाच, सायकांळी संदिप केळकर व सहकारी यांचे सुगम गायनाचा कार्यक्रम झाला. रात्री सव्वानऊ वाजता आरती, त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाले.

Check Also

खारघरमध्ये गुरू तेग बहादुर यांच्या शहिदी समागमाला प्रारंभ; विविध कार्यक्रम

पनवेल : रामप्रहर वृत्तहिंदुस्थानी संस्कृती आणि मानवी मूल्यांच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती देणारे ‘हिंद दी …

Leave a Reply