महाड : प्रतिनिधी
महाड-भोर मार्गावरील वरंध घाटामध्ये वाघजाई मंदिराजवळ बुधवारी (दि. 29) सकाळी दरड कोसळली. या घटनेत एक जण जखमी झाला आहे. ही दरड लहान स्वरूपात असल्याने घाटातील वाहतूक सुरळीत सुरू आहे. वरंध घाट पावसाळ्यामध्ये सातत्याने धोकादायक ठरत आहे. या घाटात वारंवार दरड कोसळून वाहतूक विस्कळीत होते. अनेकदा घाट बंदही ठेवण्यात येतो. मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीमध्ये या घाटात 30हून अधिक ठिकाणी दरडी कोसळल्या होत्या. गेल्या दोन दिवसांपासून महाडमध्ये पावसाला पुन्हा सुरुवात झाली आहे. बुधवारी सकाळी वरंध घाटातील वाघजाई मंदिराजवळ डोंगराचा काही भाग खाली आल्याने मंदिराजवळ खाद्यपदार्थ विकणारे अरुण पवार हे जखमी झाले. या घाटामध्ये महामार्ग विभागाकडून तैनात ठेवण्यात आलेल्या जेसिबीद्वारे ही दरड त्वरित हटवण्यात आली. त्यामुळे अरुण पवार यातून बचावले. त्यांना महाड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही दरड रस्त्याच्या एकाच बाजूला कोसळल्याने घाटातील वाहतूक सुरळीत सुरू असल्याचे राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अभियंता अमोल महाडकर यांनी सांगितले.