अतिउच्च दाबाच्या वीज टॉवरलादेखील धोका
महाड : प्रतिनिधी
निसर्गसंपन्न व ऐतिहासिक रायगड परिसरात गेल्या काही वर्षांपासून विविध कारणांसाठी उत्खनन होत आहे. सध्या रायगड संवर्धनाचे काम सुरू आहे. या कामासाठी लागणारा दगड याच परिसरातून घेतला जात असून, त्याकरिता नेवाळी वाडीच्या हद्दीत उत्खनन केले जात आहे. याचा धोका रायगड परिसरातील नैसर्गिक सौंदर्याला आणि पर्यावरणाला होण्याची शक्यता आहे. दरम्यान, वन विभागाच्या जमिनीशेजारीच होत असलेले हे उत्खनन थांबवले असल्याचे वन विभागाच्या वनपालांनी सांगितले.
घनदाट वनांनी व्यापलेला रायगड परिसर आज संवर्धनाच्या कामात मात्र नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. नव्याने घेण्यात येत असलेल्या जागामालकांमुळे हा परिसर धोक्यात आला आहे. खरेदी केलेल्या जमिनींवर सपाटीकरण करताना निसर्गाला हानी पोहचवली जात आहे, तर नेवाळी परिसरात रायगड संवर्धनासाठी लागणार्या दगडांसाठी यांत्रिक साधनांचा वापर उत्खनन केले जात आहे. यातील दगड काढून मूळ जमीन मालकाला सपाटीकरण करून देण्याचे ठरले असल्याचे येथे काम करणार्या एका कामगाराने सांगितले. किल्ले रायगडाच्या वाघोली खिंड आणि हिरकणीवाडीदरम्यान हे उत्खनन होत आहे.
याबाबत स्थानिक नागरिकांनी महाड महसूल, वन विभागाकडे दूरध्वनीवरून तक्रार दिल्यानंतर महसूल विभाग जागा झाला. महाड महसूल विभागाच्या तलाठ्यांनीही या ठिकाणी पाहणी करून पंचनामा केल्याचे तलाठी ए. एस. महाडिक यांनी सांगितले. वन विभागाची जमीन याच उत्खनन होत असलेल्या जमिनीला लागून वरील बाजूने आहे. त्यामुळे वनविभागानेदेखील तक्रारीची दखल घेत पाहणी केली आणि हे काम थांबवले असल्याचे सांगण्यात आले आहे.
ज्या ठिकाणी उत्खनन केले आहे तेथे अतिउच्च दाबाच्या विद्युत तारांचा टॉवर उभा आहे. शेजारील माती खणून काढल्याने या टॉवरलादेखील धोका निर्माण झाला आहे.
किल्ले रायगड परिसरात नैसर्गिक संपत्ती मोठ्या प्रमाणात आहे. ज्या भागात उत्खनन सुरू आहे त्या ठिकाणी वनविभागाची जागा आहे अगर नाही याची खात्री केली जाईल आणि त्यानंतर कार्यवाही केली जाईल.
-प्रशांत शिंदे, वन अधिकारी, महाड
रायगड किल्ल्याजवळ उत्खनन करण्यासाठी एक अर्ज महाड तहसील कार्यालयात सादर झाला आहे, मात्र किल्ल्याचा परिसर संवेदनशील असल्याने उत्खनन करण्यास परवानगी द्यायची की नाही याबाबत प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर ठरवले जाईल.
-सुरेश काशीद, तहसीलदार, महाड