नागोठणे : प्रतिनिधी
नागोठणे परिसरात बुधवारी (दि. 9) रात्री मुसळधार पावसाने हजेरी लावली. तरीही येथील रिलायन्स कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर सुरू असेलेले ठिय्या आंदोलन आठशे ते हजार आंदोलनकर्त्यांनी पावसात भिजूनही चालू ठेवले. निर्णय मिळाल्याशिवाय येथून उठायचेच नाही हा त्यांनी दृढनिश्चय केला असला तरी शासन आणि रिलायन्स व्यवस्थापन यांना पाझर फुटणार तरी कधी, असा सवाल विचारला जात आहे. ‘रिलायन्स’विरोधात लोकशासन आंदोलन संघर्ष समितीच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या ठिय्या आंदोलनाचा गुरुवारी (दि. 10) चौदावा दिवस होता. बुधवारी रात्री मुसळधार पावसाने या आंदोलनात हजेरी लावली. तेथे झोपलेल्या शेकडो आंदोलनकर्त्यांना पावसाने भिजवून टाकले, मात्र तेथून पळ न काढता आपण तसूभरही मागे हटणार नसल्याचे आंदोलनकर्त्यांनी दाखवून दिले. याबद्दल संघटनेचे राष्ट्रीय संघटक राजेंद्र गायकवाड यांनी गुरुवारी सकाळी घेतलेल्या एका विशेष सभेत आंदोलनकर्त्यांचे अभिनंदन केले. आंदोलनास्थळी अद्यापही पोलिसांव्यतिरिक्त प्रशासनाचा एकही अधिकारी येथे पोहोचला नसल्याबद्दल या वेळी नारायण म्हात्रे यांनी खेद व्यक्त केला.