धाटाव : प्रतिनिधी
रोहा शहरातील तहसील कार्यालय, पोलीस ठाणे आणि वनविभाग कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ कचर्याचे साम्राज्य पसरले आहे. तेथील कचरा कुजून परिसरात दुर्गंधी भरून राहिली आहे, मात्र त्याकडे कानाडोळा करून रोहा नगरपालिका रोगराईला आमंत्रण तर देत नाही ना, असा प्रश्न नागरिकांतून उपस्थित केला जात आहे. राज्यासह संंपूर्ण देशात स्वच्छ भारत अभियान राबविण्यात येत आहे, मात्र रोहा शहरात ठिकठिकाणी कचर्याचे ढिग दिसून येत आहेत. शहरातील गटारे व नाल्यांची सफाई केली जात नाही. साचलेल्या कचर्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावली जात नाही. त्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली असून, डासांचे प्रमाणही वाढले आहे. येथील पोलीस ठाणे तसेच तहसील व वनविभाग कार्यालयांच्या प्रवेशद्वाराजवळ मोठ्या प्रमाणात कचरा साचला असून तो परिसरात पसरला आहे. तो कुजल्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे या कार्यालयात नाक मुठीत धरून यावे लागते. नगरपालिका या कचर्याची विल्हेवाट का लावत नाही, असा सवाल रोहेकर नागरिक करीत आहेत.