Breaking News

वातावरणाचा हापूसच्या उत्पादनावर परिणाम

 मोहोर गळाला, तुडतुड्या रोगाचा प्रादुर्भाव; बाजारपेठेत यंदा उशिरा होणार दाखल

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त

गेल्या काही दिवसांपासून असलेले ढगाळ वातावरण व काही ठिकाणी झालेली अवकाळी कृपा यामुळे हापूसच्या उत्पादनावर परिणाम होत आहे. पावसाने मोहोर गळून पडत आहे, तर तुडतुडा रोगाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने या वर्षी उत्पादनावर परिणाम होणार आहेच, शिवाय बाजारातही हापूस उशिरा दाखल होणार आहे. आंबा शौकिनांना या वर्षी हापूसची वाट पाहावी लागणार आहे.

कोकणातील हापूस आंब्याला नोव्हेंबर महिन्यात मोहोर फुटण्याची प्रक्रिया अंशत: सुरू होते. डिसेंबर महिन्यापासून रायगड जिल्ह्यातील अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन, म्हसळे तालुक्यांतील आंब्यांच्या बागांना मोहोर फुटणे सुरू होते. मात्र या वर्षी डिसेंबर महिना अर्धा संपूनही म्हणावी तशी थंडी पडत नसल्यामुळे अपेक्षेप्रमाणे आंब्याच्या झाडांना मोहोर दिसत नाही.

सध्याच्या या परिस्थितीमुळे फेब्रुवारीऐवजी मार्चअखेरीस हापूस बाजारात दाखल होईल असे व्यापार्‍यांनी सांगितले. तीन ते चार वर्षांपासून अवकाळी पाऊस, थ्रीप्स रोगाचा प्रादुर्भाव आणि या वर्षी करोना आपत्तीमुळे आंबा उत्पादकांसाठी खडतर गेली आहेत. या वर्षी तरी चांगले उत्पादन येईल अशी आशा होती. मात्र पडत असलेला अवकाळी पाऊस व ढगाळ वातावरण पाहता मोहोर संवर्धन करून सुपारीएवढा आंबा मोठा करणे हे उत्पादकांसमोर आवाहन आहे. या वर्षी 30 ते 35 टक्के उत्पादन राहण्याचा अंदाज आहे. हवामान बदल, ढगाळ वातावरण, धुके, अवकाळी पाऊस यामुळे आंब्याच्या पिकाला तुडतुडा रोगाचा प्रादुर्भाव झाला असून काळे डाग पडत आहेत. देठात पाण्याचा शिरकाव झाल्याने फळधारणेसाठी अडचणी येत आहेत.

बागायतदार चिंतेत

सद्य:स्थितीला हवामान हापूसला पोषक नसून आलेला मोहोर काळवंडत असून तो गळूनही पडत आहे. त्यामुळे आंबा बागायतदार चिंतेत आहेत. हवामान बदलाची त्यांना प्रतीक्षा आहे. पुढील काही दिवसांत पोषक वातावरण निर्माण न झाल्यास त्याचा उत्पादनावरही मोठा परिणाम होणार असल्याचे आंबा बागायतदार सांगत आहेत.

सध्याचे वातावरण हापूससाठी मारक आहे. पुढील वातावरण कसे असेल यावर गणित अवलंबून आहे. उत्पादन, रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कराव्या लागणार्‍या फवारणी हे सर्व पुढील वातावरणावर ठरले जाईल. त्यामुळे मार्च अखेर हंगाम सुरू होईल.

-महादेव मराठे, हापूस बागायतदार, देवगड

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply