पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांचे आवाहन
पनवेल : रामप्रहर वृत्त
थर्टि फर्स्ट निमित्त अनेक जण पार्ट्यांचे आयोजन करत असतात. याही वर्षी हॉटेल, धाबे, फार्महाऊस येथे बुकींग करण्यात आलेले आहे, मात्र यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता सोशल डिस्टन्सिंग पाळावे. अनलॉक टू सुरू असले तरीदेखील नागरिकांनी नियमांना पाळूनच नववर्षाचे स्वागत करावे अन्यथा नियमांचे उल्लंघन करणार्यांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहे, अशी माहिती परिमंडळ 2चे पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांनी दिली आहे.
31 डिसेंबरनिमित्त पनवेल परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. 31 डिसेंबरच्या रात्री तरुण मंडळी मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर येतात. मात्र मद्याच्या नशेमध्ये त्यांच्याकडून अनेक ठिकाणी अपघात, मारामारी, वेगाने वाहन चालवणे, रस्त्यात गोंधळ घालणे आदी प्रकार घडत असतात. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात असणार आहे. बीट मार्शल आणि गस्ती वाहनांना रस्त्यावर ठेवण्यात येणार आहेत. नववर्षाचे स्वागत करताना अतिरेक होणार नाही याची नागरिकांनी दक्षता घ्यावी, मद्यप्राशन करून रस्त्याने गोंगाट करणे, नशेत वाहन चालवणे हे टाळण्याचे आवाहन पोलिसांतर्फे करण्यात येत आहे.
पनवेल तालुक्यातील परिसरात मोठ्या प्रमाणात फार्म हाऊसेस आहेत. याठिकाणी जंगी पार्ट्यांचे आयोजन करण्यात येते. नव वर्षाचे स्वागत करताना नागरिकांनी सोशल डिस्टन्सचे पालन करणे गरजेचे आहे. तसेच या वेळी ड्रिंक अँड ड्राइव्ह ची कारवाई करण्यात येणार आहे. मोठ्या प्रमाणात गर्दी करू नये तसेच शासनाने सांगितलेल्या नियमांचे पालन करूनच नववर्षाचे स्वागत करायचे आहे. अथवा गुन्हे दाखल करणार आहोत. थर्टी फर्स्ट साजरा करणार्यांनी दारू सेवन करून वाहन चालवू नये, असे आवाहन पोलीस दलातर्फे करण्यात येत आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper