अलिबाग : प्रतिनिधी : तालुक्यातील कुरूळ ग्रामपंचायतीमध्ये जन्माला येणार्या मुलींसाठी कुरूळ कन्या सन्मान योजना राबविण्यात येणार आहे, अशी माहिती सरपंच अॅड. जर्नादन पाटील यांनी मंगळवारी (दि. 28) पत्रकार परिषदेत दिली.
कुरूळ ग्रामपंचायतीच्या हद्दीत 20 वर्षांपासून वास्तव्य करीत असलेल्या कुटुंबातील महिलेस जर पहिले अपत्य कन्या असेल तर त्या मुलीच्या नावे ग्रामपंचायत दोन हजार रुपये मुदत ठेव ठेवणार आहे. अठराव्या वर्षी मुलीला किमान 18हजार रुपये मिळतील. 1 एप्रिल 2019 पासून ही योजना लागू होईल, अशी माहिती सरपंच अॅड. पाटील यांनी यावेळी दिली.
कुरूळ ग्रामपंचायत हद्दीत विविध विकास कामे हाती घेण्यात आली आहेत. तलावातील गाळ काढण्याचे काम सुरू करण्यात आले असून, तलावाचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. याच तलावात नौकानयन सुरू करण्याचा आमचा प्रयत्न आहे. ग्रामपंचायतीची स्वतःची पाणीपुरवठा योजना राबविण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत, अशी माहिती अॅड. पाटील यांनी दिली. यावेळी मनोज ओव्हाळ, आकाश घाडगे, भूषण बिर्जे, अवधूत पाटील उपस्थित होते.