कर्जत उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयातील स्थिती
कर्जत : प्रतिनिधी
कर्जत उपअधिक्षक भुमी अभिलेख कार्यालयात कर्मचारी यांची कमतरता असल्याने जवळपास पाचशे मोजणी अर्ज गेले तीन महिन्यांपासून प्रलंबित असल्याने शेतकर्यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. फक्त दोन सर्व्हे कर्मचारी कर्जत कार्यालयात सध्या कार्यरत असून एकूण सात जागा रिक्त असल्याने मोजणी अर्जाचा डोंगर झाला असून कामे होत नसल्याने या कार्यालयात रोजच बाचाबाची होण्याचा प्रसंग होत आहे.
कर्जत उपअधिक्षक भूमी अभिलेख कार्यालयातून संपूर्ण तालुक्याचा मोजणी अथवा शेत जमिनी संदर्भात कामे केली जातात. तालुक्याचा विस्तार खूप मोठा असल्याने या कार्यालयात मोजणी चे दर महिन्याला साधारणतः दीडशे अर्ज तरी येत असतात. तसेच नक्कल प्रत काढण्यासाठी साधारण दोनशे अर्ज येतात, मात्र गेल्या तीन चार महिन्यांपासून या कार्यालयातून अर्जाचा निपटारा न झाल्याने आजच्या तारखेस एकूण पाचशे अर्ज मोजणी कामाचे प्रलंबित असून तेवढेच अर्ज नक्कल साठी प्रलंबित आहेत.
रोज या कार्यालयात कर्मचारी आणि शेतकरी यांच्या बाचाबाची, खटके उडत आहेत. ग्रामीण भागातून लांबून येणारा शेतकरी शंभर दोनशे रुपये खर्च करून या कार्यालयात आल्या नंतर त्याचे काम होत नसल्याने बर्याच वेळा मनस्ताप होवून वाद विवाद होत आहेत.
कर्जत भूमी अभिलेख कार्यालयात सध्या फक्त दोन कर्मचारी मोजणी कामासाठी नियुक्त असून त्यातील एकवार छाननी लिपिक तसेच आवक-जावकची सुद्धा जबाबदारी दिली असल्याने फक्त एकच कर्मचारी मोजणी कामासाठी जात असल्याने एकूण 500 मोजणीचे प्रकरणे प्रलंबित राहिली आहेत.
पूर्वी या कार्यालयात एकूण नऊ मोजणी कर्मचारी नियुक्त होते, परंतु कोणाची बदली तर कोण निवृत्त झाल्याने ही पदे अनेक महिन्यापासून रिक्त असल्याने या अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यात या कार्यालयात दोन महिन्यांपूर्वी लाचलुचपत कार्यालयाने कारवाई करून छाननी लिपिक जाधव याला लाच घेताना अटक केली होती. त्यामुळे अनेक कर्मचारी आणि उपअधीक्षक कारवाईच्या भीतीने बरेच दिवस कार्यालयात येतच नव्हते.