नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियात महिलांची टी-20 विश्वचषक स्पर्धा रंगणार आहे. या स्पर्धेसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) नियमांमध्ये मोठा बदल करीत नो-बॉलचा निर्णय देण्याची जबाबदारी तिसर्या पंचांवर दिलेली आहे. याआधी आयसीसीने भारत विरुद्ध वेस्ट इंडिज मालिकेत प्रायोगिक तत्वावर या प्रणालीचा वापर केला होता. यानंतर आयसीसीच्या महत्त्वाच्या स्पर्धेत हे तंत्रज्ञान वापरण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे.
महिला टी-20 विश्वचषक स्पर्धा 21 फेब्रुवारी ते 8 मार्चदरम्यान खेळली जाणार आहे. या स्पर्धेत नो-बॉल तिसरे पंच देणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचप्रमाणे मैदानाबाहेरील कर्मचार्यांनी सांगितल्याशिवाय मैदानावरील पंचांनी नो-बॉलचा निर्णय देऊ नये, अशी सूचनाही आयसीसीने पंचांना दिली आहे. विश्वचषकासारख्या स्पर्धेत निर्णय देताना कोणत्याही प्रकारची चूक होऊ नये याकरिता तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार असल्याची माहिती आयसीसीचे जनरल मॅनेजर जेफ अल्ड्राइस यांनी दिली.
मध्यंतरी आयपीएल आणि काही कसोटी सामन्यांमध्ये मैदानावरील पंच नो-बॉलचे निर्णय अचूक देण्यात अपयशी ठरले होते. यानंतर आयसीसीने यावर काही तोडगा काढण्याची मागणी केली जात होती.