माणगाव : रामप्रहर वृत्त
शहरातील तहसील कार्यालयासमोरील रस्त्यावर रात्रीच्यावेळी अनाधिकृत खोदकाम करून पाईपलाईन टाकण्याचे काम सुरु आहे. सदर अनधिकृत काम त्वरीत बंद करावे आणि संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, अन्यथा भाजप तर्फे नगरपंचायत कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा भाजपचे माणगाव तालुका सरचिटणीस योगेश सुळे निवेदनाद्वारे दिला आहे.माणगाव नगरपंचायत हद्दीतील तहसील कार्यालय ते पंचायत समिती कार्यालयासमोरून उतेखोलवाडीकडे जाणार्या रस्त्यावर खोदकाम करुन पाईपलाईन टाकण्याचे काम सुरु आहे. कोणाचीही परवानगी न घेता हे काम रात्री उशिरा केले जात आहे. हे खोदकाम कोण करीत आहे, या बाबतची चौकशी भाजपचे योगेश सुळे यांनी केली असता नगरपंचायतीचे अधिकारी श्री. शेठ यांनी तातडीने कर्मचारी पाठवून संबंधीत खोदकाम थांबवून त्या कामावरील टिकाव, पावडे, घमेली आदी अवजारे जप्त केली. त्यानंतर योगेश सुळे, ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच नितीन दसवते, भाजप माणगाव शहर अध्यक्ष राजू मुंडे, भाजयुमो उपाध्यक्ष चिन्मय मोने यांनी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी राहुल इंगळे यांची भेट घेतली व त्यांना निवेदन दिले. कोणाचीही परवानगी न घेता खोदकाम करुन टाकलेले पाईप काढून टाकावेत व संबंधीतावर कायदेशीर कारवाई करावी, अन्यथा भाजपतर्फे नगरपंचायतीसमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असे या निवेदनात म्हटले आहे.
नगरपंचायत हद्दीतील तहसील कार्यालयासमोरील रस्त्यावर अनधिकृत खोदकाम सुरू आहे. या प्रकरणाची माहिती घेऊन संबंधितांवर योग्य ती कारवाई करू.
-राहुल इंगळे, मुख्याधिकारी, नगरपंचायत, माणगाव