Breaking News

विजय हजारे क्रिकेट स्पर्धा, पावसामुळे मुंबई संघ बाद

बंगळुरू : वृत्तसंस्था

पावसाच्या खेळखंडोब्यामुळे गतविजेत्या मुंबईला विजय हजारे करंडक क्रिकेट स्पर्धेतून गाशा गुंडाळावा लागला आहे. यशस्वी जैस्वाल (नाबाद 60) आणि आदित्य तरे (नाबाद 31) या सलामी जोडीच्या भागीदारीमुळे मुंबई विजयाच्या दिशेने मार्गक्रमण करीत असतानाच पावसामुळे सामना अर्धवटच रद्द करण्यात आला, परंतु साखळीत मुंबईपेक्षा एक जास्त विजय मिळवल्याने छत्तीसगडने उपांत्य फेरी गाठली.

आलूर येथील केएससीए स्टेडियमवर झालेल्या या लढतीत नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करताना धवल कुलकर्णीने (आठ षटकांत नऊ धावा आणि दोन बळी) केलेल्या टिचून गोलंदाजीमुळे मुंबईने छत्तीसगडला 45.4 षटकांत 6 बाद 190 धावांवर रोखले. शिवम दुबे, शार्दूल ठाकूर, ध्रुमिल मतकर यांनीही मुंबईसाठी प्रत्येकी एक बळी मिळवला. पावसामुळे मुंबईला 40 षटकांत 192 धावांचे सुधारित लक्ष्य देण्यात आले.

प्रत्युत्तरात गेल्या लढतीतील द्विशतकवीर यशस्वी आणि अनुभवी तरे यांनी पुन्हा एकदा दमदार सलामी नोंदवताना अवघ्या 11.3 षटकांत 95 धावा फटकावल्या. विशेषत: 17 वर्षीय यशस्वीने प्रत्येकी पाच चौकार व षटकारांसह 38 चेंडूंत 60 धावा केल्या. ही जोडी मुंबईला सहज विजय मिळवून देणार असे वाटत असतानाच पुन्हा पाऊस आला. सामना रद्द झाल्याने सलग दुसर्‍यांदा उपांत्य फेरी गाठण्याचे मुंबईचे स्वप्न भंगले.

Check Also

खारघरमध्ये नाट्यगृह उभारणीकरिता भूखंड द्या

आमदार प्रशांत ठाकूर यांची सिडकोकडे आग्रही मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त एज्युकेशनल हब असलेल्या खारघरमध्ये …

Leave a Reply