ग्रामस्थांचे तहसीलदारांना निवेदन
रोहे : प्रतिनिधी
तालुक्याच्या पश्चिम विभागातील 26गाव नळ पाणीपुरवठा योजनेतून सातत्याने अनियमित पाणीपुरवठा होत असल्याने संबंधीत ग्रामस्थांनी प्रशासनाकडे वेळोवेळी तक्रारी केल्या आहेत. या योजनेतून सुरळीत पाणी पुरवठा व्हावा, अशी मागणी रोहा तालुक्यातील भातसई ग्रामस्थांनी तहसीलदार कविता जाधव यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
रोहा तालुक्यातील 26 गाव नळ पाणीपुरवठा योजना कोट्यवधी रुपये खर्च करून तयार करण्यात आली आहे. मात्र या योजनेअंतर्गत येत असलेल्या काही गावांना तसेच अंतिम गावापर्यंत पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळे या योजनेतून सुरळीत पाणीपुरवठा व्हावा, यासाठी अनेकदा स्थानिकांनी प्रशासनाकडे निवेदने दिली आहेत. या 26 गाव नळ पाणीपुरवठा योजनेतून भातसई गावाला आठ दिवसातून एकदाच पाणीपुरवठा होत असल्याने या गावात पाणीटंचाई निर्माण होत आहे. पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्याने ग्रामस्थांनी पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी तहसीलदार कविता जाधव यांना पाणीपुरवठा सुरळीत व्हावे यासाठी निवेदन दिले. या वेळी सरपंच गणेश खरीवले, ग्रामस्थ मंडळ अध्यक्ष सुभाष खरीवले, तंटामुक्ती समिती अध्यक्ष मोरेश्वर खरीवले, ग्रामपंचायत सदस्य जयवंत खरीवले, सुरेश कोतवाल, ग्रामस्थ मंडळ उपाध्यक्ष दत्ता खरीवले, तुळशीराम खरीवले, नितीन खरीवले, सूर्यकांत वाघमारे आदी उपस्थित होते.
अनियमित पाणीपुरवठा होत असल्याने भातसई ग्रामस्थांसमोर पाणी प्रश्न निर्माण झाला आहे. जानेवारीमध्ये ही स्थिती तर मे महिन्यापर्यंत काय अवस्था होईल, याची दखल घेऊन प्रशासनाने गावाचा पाणीपुरवठा सुरळीत करावा.
-गणेश खरीवले, सरपंच, भातसई, ता. रोहा