Breaking News

सिडको मेट्रो प्रकल्प मार्ग क्र. 1च्या अंमलबजावणीचे काम महामेट्रोला

नवी मुंबई ः सिडको वृत्तसेवा

सिडकोकडून नवी मुंबईमध्ये साकारण्यात येत असलेल्या नवी मुंबई मेट्रो प्रकल्पातील 11.1 किमीच्या मार्ग क्र. 1वरील उर्वरित कामांची अंमलबजावणी करण्यासाठी महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनची (महामेट्रो) खर्च ठेव प्रणालीनुसार नियुक्ती करण्याचा निर्णय नुकताच सिडको महामंडळातर्फे घेण्यात आला. यानुसार मार्ग क्र. 1वरील उर्वरित कामे पूर्ण करण्याचे काम यापुढे महामेट्रो करणार आहे.

नवी मुंबईतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने सिडको नवी मुंबईमध्ये मेट्रो प्रकल्प साकारत आहे. मार्ग क्र. 1वर सप्टेंबर 2019मध्ये मेट्रोची चाचणी यशस्वीरीत्या पार पाडण्यात आली होती. मेट्रो प्रकल्पासाठी सिडकोतर्फे नवी मुंबईतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेशी संबंधित विविध मुद्द्यांचा आणि त्यातील व्यामिश्रतेचा सखोल अभ्यास करण्यात आला होता. यामध्ये विद्युत पुरवठा, माहिती तंत्रज्ञान, स्थापत्य आणि यांत्रिक अभियांत्रिकी, दूरसंचार आणि संदेशवहन या विविध बाबींचा समावेश होता. सद्यस्थितीत मार्ग क्र. 1वर उभारण्यात येणार्‍या 11 स्थानकांपैकी 1 ते 6 स्थानकांच्या उभारणीचे काम काही तांत्रिक कारणांमुळे तसेच कोविडमुळे उद्भवलेल्या स्थितीमुळे अपेक्षित गतीने होत नव्हते. त्यामुळे सदर मार्गावरील उर्वरित कामे लवकरात लवकर पूर्ण करणे आणि प्रकल्पासाठी आर्थिक स्रोत निर्माण करणे या निकषांचा विचार

करून या मार्गाचे काम महामेट्रो यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

महामेट्रो कंपनीस नुकत्याच यशस्वीरीत्या कार्यान्वित झालेल्या नागपूर मेट्रो टप्पा 1 आणि पुणे मेट्रो प्रकल्पांतर्गत विकसित करण्यात येत असलेल्या मार्ग क्र. 1 आणि 2च्या बांधणी, अंमलबजावणी आणि परिचालन व निगराणीचा अनुभव आहे. त्यामुळे नवी मुंबई मेट्रो मार्ग क्र. 1वरील उर्वरित कामांची जलदरीत्या अंमलबजावणी व्हावी याकरिता महामेट्रोची नियुक्ती करण्याचा निर्णय सिडकोतर्फे घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे मेट्रो मार्ग 1 जलद गतीने पूर्ण होऊन या मार्गावर लवकरच प्रवासी वाहतूक सुरू करणे शक्य होणार आहे. तसेच या प्रकल्पात गुंतवणूक केलेल्या भागधारकांना आणि नागरिकांना त्यांनी केलेल्या गुंतवणुकीवर उत्तम परतावा मिळणार आहे. नवी मुंबईकरांना प्रवासाचा जलद व सुखद पर्याय देण्यासह नवी मुंबईच्या आर्थिक विकासातही नवी मुंबई मेट्रो प्रकल्प योगदान देणारा ठरणार आहे.

प्रकल्पासाठी अर्थपुरवठा, आर्थिक शिस्त, मेट्रो मार्गालगतच्या जमिनीचे मुद्रीकरण, प्रवासी भाड्याव्यतिरिक्त अन्य महसूल वाढवणे आणि उत्तम परिवहन जोडणी देणे या बाबींवरही आपण लक्ष केंद्रित करणार आहोत. परिवहनकेंद्रीत विकासाकरिता आम्ही सदैव कटिबद्ध आहोत.

-डॉ. संजय मुखर्जी, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको

Check Also

खासदार श्रीरंग बारणे यांना पुन्हा विजयी करण्यासाठी बैठका

महायुतीच्या नेत्यांनी केले मार्गदर्शन पनवेल : रामप्रहर वृत्त मावळ लोकसभा मतदारसंघातील भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, …

Leave a Reply