एकनाथ देशेकर यांची मागणी
पनवेल ः प्रतिनिधी
तालुक्यातील चिंध्रण, कानपोली, महाळुंगे गावांतील शेतकर्यांच्या जमिनी प्रस्तावित अतिरिक्त तळोजा औद्योगिक क्षेत्राकरिता संपादित करण्यात आल्या आहेत. त्या शेतकर्यांना प्रतिहेक्टरी साडेचार कोटींचा मोबदला उच्चाधिकार समितीने ठरवून दिला आहे. तो मोबदला त्वरित मिळावा अशा आशयाचे निवेदन एकनाथ देशेकर यांच्या शिष्टमंडळाने पनवेल प्रांत कार्यालयात निवासी नायब तहसीलदार महेंद्र बेलदार यांना दिले आहे.
तालुक्यातील चिंध्रण, कानपोली, महाळुंगे गावांतील जमिनी प्रस्तावित अतिरिक्त तळोजा औद्योगिक क्षेत्राकरिता संपादित करण्यात आल्या आहेत. याबाबत शेतकर्यांना उपविभागीय अधिकारी पनवेल यांच्याकडून 19 ऑक्टोबर 2020 रोजी महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम 1961चे कलम 32 (1) अन्वये नोटीसही देण्यात आली आहे. सातबारा व फेरफारवर तशा नोंदीही झाल्या आहेत, मात्र अद्याप भूसंपादनाचा मोबदला मिळाला नाही. तरी त्यांना जो प्रतिहेक्टरी साडेचार कोटींचा मोबदला उच्चाधिकार समितीने ठरवून दिला आहे तो त्वरित मिळावा अशा आशयाचे निवेदन एकनाथ देशेकर यांच्या शिष्टमंडळाने संबंधितांना दिले.
प्रधान सचिव उद्योग तथा अध्यक्ष उच्चधिकार समिती यांच्या अध्यक्षतेखाली 13 जुलै 2020 रोजी झालेल्या बैठकीमध्ये साडेचार कोटी प्रतिहेक्टरी मोबदला देण्याचे शासनाकडून मान्य केले आहे. आजमितीस हा मोबदला बाजारभावापेक्षा जरी असला तरी एमआयडीसीमुळे या गावांचा विकास होऊन सुशिक्षित तरुणांना नोकरी, कामधंदे मिळतील या सद्भावनेने जमिनी साडेचार कोटी प्रतिहेक्टरी देण्यास शेतकरी तयार झाले आहेत. सदर भूसंपादनाची कलम 32(1)ची नोटीसही शेतकर्यांना बजावली. त्यामुळे सातबारा व फेरफारला महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ समाविष्ट असा शेरा असल्याने या जमिनी अन्य कोणालाही विक्री, अथवा बँकेकडे तारण ठेवून कर्जही घेऊ शकत नाही.
संपादित जमिनीचा आर्थिक मोबदला प्रलंबित असल्याने शेतकर्यांची आर्थिक कुचंबणा झाली आहे. अनेक कुटुंबांचे विवाह सोहळे, आर्थिक गुजराण करणे शक्य नसल्याने तसेच उच्च शिक्षणाकरिता लागणारा पैसा नसल्याने भावी पिढी शिक्षणापासून वंचित राहू शकते. त्यामुळे प्रस्तावित भूसंपादनाचा मोबदला तातडीने मिळावा याकरिता एकनाथ देशेकर यांच्यासह शिष्टमंडळाने उपविभागीय अधिकारी पनवेल, जिल्हाधिकारी रायगड, प्रादेशिक अधिकारी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांना निवेदन दिले आहे. या वेळी एकनाथ देशेकर यांच्यासह दिनेश पाडेकर, मधुकर पाडेकर, अरुण देशेकर, अल्पेश कडू, भास्कर पाटील, आत्माराम पाटील, राम देशेकर, तकदीर पाडेकर, बाळाराम कडू, ज्ञानदेव पाडेकर, लहू पाटेकर आदी शेतकरी उपस्थित होते.