Breaking News

किनारा सुरक्षेसाठी पोलिसांचे ‘सागर कवच’; मुरूडचे निरीक्षक परशुराम कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली अभियान

मुरूड : प्रतिनिधी

सागरी सुरक्षा यंत्रणा किती सक्षम आहे हे तपासण्यासाठी रायगड पोलीस दलाकडून सागर कवच अभियान राबविण्यात येत असते. त्यानुसार मुरूड पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सागर कवच अभियानाला सागरी किनारी भागात ठिकठिकाणी सुरुवात करण्यात आली आहे. मुंबईत 1992मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट हल्ल्यातील आरडीएक्स रायगड जिल्ह्यातील शेखाडीमार्गे नेण्यात आले होते. 2011 साली मुंबईवर हल्ला करणारे दहशतवादी समुद्रमार्गेच आले होते. या पार्श्वभूमीवर सागरी सुरक्षेवर जास्त लक्ष दिले जाते. सहा महिन्यांनी जिल्हा पोलीस दलाकडून सागरी कवच अभियान राबविण्यात येते. यंत्रणांमधील सुसंवाद, सावधानता तसेच सज्जता अशा तीन महत्त्वाच्या बाबीवर आधारित या ऑपरेशनमध्ये नौदल, कोस्टगार्ड, मेरीटाइम बोर्ड यांचा सहभाग असतो. पोलीस ठाणे हद्दीतील संवेदनशील व गर्दीच्या ठिकाणी तपासणी व टेहळणी केली जाते. मुरूड पोलीस ठाण्याकडून सागरी हद्दीत गस्त करण्याकरिता सागरी सुरक्षा शाखेचे सहा अधिकारी, 56 अंमलदार या अभियानात सहभागी झाले होते. सागर कवच अभियानामध्ये शिघ्रे चेक पोस्ट, आगरदांडा, राजपुरी, काशिद, मुरूड आदी ठिकाणांसह समुद्र किनार्‍यावर कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या वेळी लहान मोठ्या वाहनांची तपासणी व वाहनचालकांचे परवाने तपासण्यात आले. विना लायसन्स मोटरसायकल चालविणार्‍यांची फारच भंबेरी उडाली. वाहनांची तपासणी करून त्याची नोंद घेणे, मच्छीमारी बोटी तपासून परवाने व तत्सम कागदपत्रांची माहिती घेऊन  सदरची नौका आपल्याच भागातील आहे किंवा कसे याची खात्री करून घेणे, वाहनांच्या तपासणीद्वारे सजगता बाळगून अतिरेकी कारवाया रोखणे अशा अनेक गोष्टी रोखण्यासाठी सागर सुरक्षा कवच खूपच लाभदायक अभियान ठरले आहे.

सागरी सुरक्षा खूप महत्त्वाची असून त्यात नागरिकांचा सहभाग गरजेचा आहे. सागरी किनार्‍यावरील मच्छीमारांनी एखादी संशयास्पद बोट आढळून आल्यास अथवा वाहनातून गैरवाहतुकीचा संशय येताच तातडीने नजीकच्या पोलीस ठाण्याशी संपर्क करून देशहिताला महत्त्व द्यावे.

-परशुराम कांबळे, निरीक्षक, मुरूड पोलीस ठाणे

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply