सिडनी : वृत्तसंस्था
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसर्या कसोटी सामन्यात दुखापतग्रस्त झालेला भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजावर सिडनी येथे शस्त्रक्रिया करण्यात आली. जडेजाच्या डाव्या हाताचा अंगठ्याला दुखापत झाली आहे. यशस्वी शस्त्रक्रियेनंतर जडेजाने लवकरच संघात परतण्याचे संकेत दिले आहेत.
तिसर्या कसोटी सामन्यात फलंदाजी करताना मिचेल स्टार्कने टाकलेला आखूड टप्प्याचा चेंडू टोलावताना जडेजाचा अंगठा दुखावला गेला होता. दुखापत असतानाही सामना वाचवण्यासाठी वेदनाशामक इंजेक्शन घेऊन मैदानात फलंदाजीस उतरण्यास जडेजा तयार झाला होता, मात्र तशी वेळ आली नाही. सामन्यानंतर सिडनीतच त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली.
या संदर्भात जडेजाने आपल्या ट्विटमध्ये म्हटले की, दुखापतीमुळे थोड्या कालावधीसाठी क्रिकेटच्या रोमांचापासून दूर जात आहे. शस्त्रक्रिया यशस्वी झाली. लवकरच नव्या जोशाने मैदानात परत येईन.
रवींद्र जडेजावर यशस्वी शस्त्रक्रिया झाली असली तरी तो मायदेशात होणार्या इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांना मुकणार आहे. या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेला 5 फेब्रुवारीपासून चेन्नई येथे सुरुवात होणार आहे.