बँकॉक : वृत्तसंस्था
भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिला कोरोनाची लागण झाली असून, कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर सायनाने थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेतून माघार घेतल्याचे वृत्त आहे. दरम्यान, बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडियामधील सूत्रांनी मात्र सायनाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचे वृत्त चुकीचे असल्याचे म्हटले आहे.
आठवडाभरापूर्वी सायनाने कोरोनावर मात करीत पुन्हा सराव सुरू केला होता, पण स्पर्धेपूर्वी घेण्यात आलेल्या तिसर्या कोरोना चाचणीमध्ये तिचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे सायनाला थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेतून माघार घ्यावी लागणार असल्याचे बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनकडून सांगण्यात आले होते तसेच कोरोना विषाणूचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर सायनाला रुग्णालयातच विलगीकरणात ठेवण्यात आले असून, सायनाच्या संपर्कात असलेला पती पी. कश्यप यालाही विलगीकरणात ठेवण्यात आल्याचे वृत्त होते. बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडियामधील सूत्रांनी मात्र ते फेटाळले आहे.
प्रणोयचा रिपोर्टही पॉझिटिव्ह
कोरोनामुळे जवळपास 10 महिन्यांनंतर आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धांना सुरुवात होत आहे, मात्र त्यापूर्वीच भारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवाल तसेच एच. एस. प्रणोयला कोरोनाची लागण झाली आहे. थायलंडमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या वाढल्याने चीनने या स्पर्धेतून माघार घेतली आहे, तर जगातील अव्वल खेळाडू केंटो मोमोटा कोरोनाग्रस्त आढळून आल्याने जपानने अखेरच्या क्षणी या स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला.