खासदार नारायण राणे कडाडले
मुंबई : प्रतिनिधी
नव्या कृषी कायद्यांविरोधात मुंबईतील आझाद मैदानात 23, 24, 25 जानेवारी रोजी होणार्या शेतकरी आंदोलनात महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही पक्षांचे मुख्य नेते सहभागी होणार आहेत. यावरून भाजप खासदार नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत समाचार घेतला आहे. हे आंदोलन राजकीय आहे. वर्षभरात शेतकर्यांच्या हिताचे एकही काम राज्य सरकारने केलेले नाही. आता यांना पुळका आला आहे. ते बिल शरद पवारांनी आता वाचले असेल. यापूर्वी तेच प्रयत्न करत होते. शेतकर्यांना माल कुठेही विकण्याची परवानगी आहे. हे चुकीचे आहे का? मग विरोध कशाला? धान्य आणि भाज्या मातोश्रीत नेऊन विकायच्या का? तो दरवाजा, पिंजरा बंदच असतो. मग विकायचा कुठे?, अशी विचारणा राणे यांनी या वेळी केली.
शेतकर्यांचे प्रश्न सुटावेत यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नवे कृषी कायदे आणले आहेत. हेच उद्धव ठाकरे प्रचारादरम्यान शेतकर्यांना नुकसानभरपाई म्हणून 50 हजार देणार बोलले होते. त्याचे काय झाले? किमान 10 हजार तरी द्यावेत. शेतकर्यांच्या हिताचे तसेच न्याय देण्याचे कोणतेही काम सध्याचे सरकार करू शकत नाही. कारण यांच्या तिजोरीत पैसा नाही, अशी टीका नारायण राणे यांनी केली आहे.
सरकारी कर्मचार्यांचे पगार वेळेवर होत नाहीत. एसटीचे पगार दोन तीन महिने होत नाहीत, बेस्टचेही तसेच आहे. सरकारची अवस्था डबघाईला आली आहे. त्यामुळे आधी ते सुधारा मग रस्त्यावर या. आमचा काय रस्त्यावर येण्यासाठी नकार नाही. निदान ‘मातोश्री’तून मुख्यमंत्री बाहेर तरी पडतील. पिंजर्याच्या बाहेर आल्यावर लोक मुख्यमंत्री कसा आहे हे तरी किमान पाहतील, असा टोला राणे यांनी लगावला.
नरेंद्र मोदींनी शेतकर्यांच्या हितासाठी कायदा केला असून शेतकरी खूश आहेत. म्हणूनच फक्त राजकीयदृष्ट्या भाजपच्या विरोधातील लोक एकत्र आले आहेत. भाजपला जे यश मिळत आहे ते पाहवत नाही म्हणून पोटदुखीमुळे आंदोलन सुरू आहे, असे राणे म्हणाले.
ग्रामपंचायत निवडणुकीत सगळे पक्ष आपण पहिल्या क्रमांकावर असल्याचा दावा करीत आहेत. यासंबंधी बोलताना ते म्हणाले की, भाजपचा दावा खरा असतो आणि आहे. भाजप जी माहिती देते ती खरी असते. आम्हाला त्यासाठी हेराफेरी करण्याची गरज नाही. आमचे सदस्य फिरवण्याची ताकद विरोधकांमध्ये नाही. तसे केल तर परिणाम गंभीर होतील.
औरंगाबादच्या नामकरणावर बोलताना ते म्हणाले की, बाळासाहेब वरून पाहत असतील तर अशा पुत्राला काय म्हणत असतील. औरंगाबादमध्ये संभाजीनगर म्हणून बाळासाहेबांनी जाहीर केले होते. मुलगा मुख्यमंत्री असताना त्याची पूर्तता होत नाही हे दुर्दैव आहे. साहेबांच्या आदेशापेक्षा मुख्यमंत्रिपद मोठे वाटते. एकतर लाचारी करुन पद मिळविले, त्याही पदाचा घरात बसून वापर होत नाही. औरंगाबादचे संभाजीनगर जाहीर करायचे सोडून टिपू सुलतानची जयंती साजरी करीत आहेत. ही शिवसेना नाही. आम्ही होतो ती वेगळी आणि आत्ताची शिवसेना वेगळी आहे.
मुख्यमंत्री जरी असले तरी सरकारी यंत्रणा हाताळण्याचे ज्ञान, अभ्यास नाही. गाडी चालवायची माहिती, असेल पण सरकार चालवण्याचा अभ्यास नाही. त्यामुळे सरकार पुढे जात नाही. सरकारच्या अपयशाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जबाबदार आहेत, असा आरोप राणे यांनी केला.