नागोठणे : प्रतिनिधी
नवी मुंढाणी येथे सामाजिक सभागृह बांधल्याचे खोटे कारण दाखवून भ्रष्टाचार केला आहे. संबंधित भ्रष्टाचार्यांच्या विरोधात कारवाई करावी व अपहारीत रक्कम वसूल होण्यासंदर्भात त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी या गावातील केशव के. कुथे आणि जनार्दन के. कुथे या दोन वृद्ध बंधूनी जिल्हाधिकार्यांकडे केली आहे. तसेच पुढील कार्यवाही न झाल्यास 2 फेब्रुवारीपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला बसणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे. केशव कुथे आणि जनार्दन कुथे यांनी रायगडच्या जिल्हाधिकार्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पेण तालुक्यातील शिहू ग्रामपंचायत हद्दीत असणार्या नवी मुंढाणी येथे ग्रामपंचायतीच्या चौदाव्या वित्त आयोगाच्या आराखड्यात सामाजिक सभागृह दुरुस्ती करण्याच्या उद्देशाने दोन लाख रुपये खर्चाचे काम मंजूर झाले आहे. मात्र सरपंच आणि ठेकेदार यांनी संगनमताने सामाजिक सभागृहाची कोणत्याही प्रकारची सुधारणा तसेच दुरुस्ती न करताच ग्रामस्थांनी नव्याने बांधलेल्या हनुमान मंदिरावर खोटे व्हॅल्यूएशन व ग्रामस्थांच्या खर्चातून बांधलेल्या कॉलम, स्लॅब, भिंती या नवीन कामावर खोटे बील नोंदवून ग्रामपंचायत शिहूमधील मंजूर आराखड्यातील दोन लाख अपहारीत केले असल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे. संबंधित बाब आमच्या निदर्शनास आल्यावर संबंधित सरकारी यंत्रणेकडे तक्रार करूनही आम्हाला न्याय मिळाला नसल्याचे निवेदनात म्हटले आहे. ताठरे नामक एक अभियंता तर तुम्हाला काय करायचे आहे ते करा, अशी उत्तरे देत आहे. ग्रामस्थांनी बांधलेल्या हनुमान मंदिराला केलेल्या कामाची खोटी पाटी लावण्याचा प्रयत्न केला असल्याचे जिल्हाधिकार्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले आहे. सरपंच आणि ठेकेदार यांनी सामाजिक सभागृह पाडण्यासाठी पंचायत समिती आणि बांधकाम उपविभाग पेण यांची कोणत्याही प्रकारची पूर्वपरवानगी न घेता, आपला भ्रष्टाचार लपविण्यासाठी सभागृह पाडून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला असून संबंधितांवर कारवाई होण्यासाठी 2 फेब्रुवारीपासून अलिबाग येथे बेमुदत उपोषणाला बसणार असल्याचा इशारा या निवेदनाच्या शेवटी देण्यात आला आहे. या निवेदनाची प्रत पोलीस अधीक्षक – अलिबाग, रायगड जिल्हा परिषद, गटविकास अधिकारी – पेण, नागोठणे पोलीस ठाणे, कार्यकारी अभियंता (राजिप), उपअभियंता – पेण, तहसीलदार – पेण आणि अलिबाग, पोलीस ठाणे -अलिबाग यांना देण्यात आली आहे.