मुरुड : प्रतिनिधी
तालुक्यात बिबट्याचा वावर दिसून आल्याने वन विभागाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मुरूड तालुक्यातील सुपेगाव, सुमरादेवी, वेळासते, वावडुनगी, वावे, म्हसाडी, जोसरंजन, भालगाव आदी परिसरात बिबट्याचा वावर दिसून आला आहे. या भागातील अनेकांना बिबट्याचे दर्शनी झाल्यानंतर त्यांनी त्याबाबत वन विभागास माहिती दिली. काही ग्रामस्थांनी बिबट्याने वासरू व बकर्यांची शिकार केली असल्याचे सांगितले. वन कर्मचार्यांनांही बिबट्याचा वावर दिसून आल्याने वन विभागाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मुरुड तालुक्यात सुमारे 54 चौरस किलोमीटर परिसरात फणसाड अभयारण्याची व्याप्ती असून, यामध्ये अनेक वन्यजीवांचे वास्तव्य आहे. अभयारण्याशेजारी अनेक गावे असल्याने त्यांनी खबरदारी घेणे खूप आवश्यक असल्याचे मत वनविभागाने व्यक्त केले आहे. बिबट्या दिसताच वन विभागाला कळवण्याचे सांगण्यात आले आहे.अभयारण्यालगतच्या सर्व ग्रामपंचायतींना वन विभागाकडून सतर्क व काळजी घेण्याचे कळवण्यात आले असून, मोकळ्या जागेत लहान मुलांना एकटे पाठवू नका, असे आवाहन करण्यात आले आहे.
अभयारण्य परिसरात बिबट्याचा वावर वाढला आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. जंगल भागांत हातात काठी घेऊन फिरावे. रात्रीच्या वेळी घरातून बाहेर पडू नये. लहान मुलांना एकटे बाहेर पाठवू नये. तसेच अभयारण्यालगतच्या सर्व ग्रामपंचायतींनी सतर्क राहावे.
-प्रशांत पाटील, वनपरिक्षेत्र अधिकारी, मुरुड