Breaking News

नव्या गुंतवणूकदारांसाठी म्युच्युअल फंडांचाच मार्ग योग्य का आहे?

शेअर बाजाराने नवा उच्चांक गाठला की त्यात गुंतवणूक करण्याची इच्छा अनेकांची होते. पण पुरेशा अनुभवाच्या अभावी त्यांना मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागते. अशा स्थितीत नव्या गुंतवणूकदारांनी म्युच्युअल फंडातच गुंतवणूक सुरू करून शेअर बाजारातील गुंतवणुकीचा अनुभव घ्यावा, असे का म्हटले जाते. त्याची ही कारणे..

भारतीय शेअर बाजाराच्या सेन्सेक्सने गेल्या आठवड्यात 50 हजार अंशांचा महत्त्वाचा टप्पा गाठला. नंतर शेअर बाजार लगेचचखाली आलेला असला तरी तो टप्पा गाठण्यास महत्त्व आहे. याचा अर्थ लवकरच तो पुन्हा 50 हजार अंशाला जावू शकतो. बाजारात ज्यावेळी अशी तेजी असते आणि आपण किती कमी दिवसांत किती जास्त पैसे कमावले, असे आपल्या आजूबाजूचे लोक सांगू लागतात किंवा बाजारातील कमाईविषयीचे लेख प्रसिद्ध होऊ लागतात तेव्हा अशा कमाईचे आकर्षण वाटणे, हे अगदी साहजिक आहे. पण तुम्ही जर आतापर्यंत शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचा अनुभव घेतला नसेल, तर त्याने अशा उच्चांकावर बाजार असताना थेट बाजारात कधीही गुंतवणूक करू नये. पण मग शेअर बाजाराच्या गुंतवणुकीचे महत्त्व वाढत असताना त्यापासून त्याने दूरच रहावे का?

ज्यांना शेअर बाजारातील गुंतवणुकीचे आकर्षण, तो उच्चांक गाठत असताना निर्माण झाले आहे, त्यांनी त्यात जरूर भाग घ्यावा. पण अशांनी शेअर बाजारात थेट खरेदी-विक्री करण्याऐवजी म्युच्युअल फंडाच्या मार्गाने या गुंतवणुकीचे फायदे घ्यावेत. असे का करावे, याची पुढील काही कारणे आहेत.

1. थेट शेअरमध्ये गुंतवणूक करण्यासाठी मोठी रक्कम लागते. मात्र म्युच्युअल फंडांत 500 रुपयांनीही सुरुवात करता येते.

2. बाजारात पाच हजारांवर कंपन्या आहेत. त्यातील कोणत्या कंपन्यांत गुंतवणूक करावी, हे वैयक्तिक गुंतवणूकदार पुरेशा अभ्यासाअभावी ठरवू शकत नाहीत. म्युच्युअल फंडचे व्यवस्थापक अभ्यासू असतात. त्यामुळे शेअर बाजार पडतो, तेव्हा नुकसान मर्यादित होते.

3. शेअर बाजार ही अधिक जोखीम असलेली गुंतवणूक आहे. त्यामुळे बाजारात चढउतार होतातच. असे मोठे चढउतार सहन करण्याची नव्या गुंतवणूकदारांची तयारी नसते. त्यामुळे त्यांना मानसिक त्रास होतो. बहुतांश म्युच्युअल फंड हे शेअर बाजाराशीच संबंधित असतात, पण हे चढउतार म्युच्युअल फंडात तेवढे धक्कादायक नसतात.

4. दीर्घकालीन गुंतवणुकीचा संकल्प नव्या गुंतवणूकदारांनी केलेला असतो तरी ते बाजारातील चढउताराला घाबरून खरेदी विक्री अधिक करतात. त्यामध्ये ब्रोकरेज, एसटीटी, जीएसटी असे कर जात असतात. म्युच्युअल फंडांची खरेदी-विक्री करताना एवढे कर

लागत नाहीत.

5. शेअर बाजारातील थेट गुंतवणूक ही लिस्टेड कंपन्यांमध्येच केली जाऊ शकते, मात्र म्युच्युअल फंडाच्या मार्गाने डेट, सोने अशा संपत्तीच्या इतर प्रकारातही गुंतवणूक करता येते.

6. थेट गुंतवणुकीसाठी विशिष्ट कंपन्या निवडल्या आणि त्यांचे शेअर घेतले, तर त्यातील काही कंपन्यांचे भाव खूप खाली येवू शकतात. मात्र म्युच्युअल फंड व्यवस्थापक विशिष्ट कंपनीत जास्तीत जास्त (उदा. 10 टक्के) गुंतवणूक करू शकतात. याविषयी सेबीचे नियम अतिशय कडक असल्याने गुंतवणूकदार अशावेळी सुरक्षित राहतात.

7. शेअर बाजारातील थेट गुंतवणुकीतून झालेल्या नफ्यावर कर द्यावा लागतो, तेवढा कर म्युच्युअल फंडातून झालेल्या नफ्याला द्यावा लागत नाही.

8. थेट गुंतवणुकीत आपल्याकडील शेअरच्या किमतीतील चढउतारामुळे अस्वस्थता येवू शकते. पण म्युच्युअल फंड गुंतवणूक कोणत्या कंपन्यांत आहे, याच्याशी आपला थेट संबंध नसतो.

9. बाजारातील चढउतारांवर लक्ष ठेवून शेअर विकत घेणे किंवा योग्य वेळी त्यांची विक्री करणे, हे शक्य होतेच, असे नाही. म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना मात्र आपण आपल्या सोयीने हे व्यवहार करू शकतो. हे व्यवहार आता अ‍ॅपवरही होऊ शकतात.

10. रिटायरमेंट फंड, चिल्ड्रेन फंड तसेच टॅक्स सेवर असेही फंड असल्याने त्या त्या उद्देशासाठी गुंतवणूक करण्याची संधी म्युच्युअल फंड देतात, पण थेट शेअर घेताना असे उद्देश पूर्ण होतीलच, असे खात्रीने म्हणता येत नाही. कारण थेट खरेदी-विक्रीमध्ये जोखीम वाढते.

अर्थात, एक गोष्ट येथे स्पष्ट केली पाहिजे, ती म्हणजे थेट शेअर खरेदी केल्यामुळे कंपन्यांचा मिळणारा डिव्हीडंड, बोनस शेअर, मतदानाचा अधिकार तसेच चांगल्या कंपन्यांच्या शेअरमध्ये होणार्‍या वाढीचा फायदा मिळतो. तो म्युच्युअल फंड गुंतवणुकीत मिळत नाही. पण हे सर्व फायदे मिळविण्यासाठी शेअर बाजाराचा अभ्यास असायला हवा. असा अभ्यास असणार्‍या गुंतवणूकदारांनाही अनेकदा मोठ्या नुकसानीचा सामना करावा लागतो. पण त्यांच्याकडे भांडवलाची कमी नसल्याने ते त्यातून मार्ग काढतात. सर्वसामान्य गुंतवणूकदार मात्र त्या नुकसानीतून बाहेर येवू शकत नाहीत. त्यामुळे ज्यांची जोखीम पेलण्याची क्षमता आहे त्यांनी शेअर बाजारात थेट गुंतवणूक करावी. मात्र ज्यांची सुरुवात आहे, त्यांनी एसआयपीच्या मार्गाने म्हणजे दर महिन्याला विशिष्ट रक्कम म्युच्युअल फंडात गुंतवावी, हे चांगले. तुम्ही अशा गुंतवणुकीसाठी पाच किंवा त्यापेक्षा अधिक वर्षे देऊ शकला तर त्यातून दीर्घकालीन आर्थिक उद्दिष्ट साध्य होण्यास मदत होईल, एवढे नक्की.

चांगला परतावा देणारे काही म्युच्युअल फंड

* एक्सिस ब्लूचिप फंड

* कोटक इमरजिंग इक्विटी फंड

* एसबीआय स्मॉलकॅप फंड

* टाटा डिजिटल इंडिया फंड

* मिराई असेट हेल्थकेअर फंड

* कॅनरा रोबेको इक्विटी हायब्रीड फंड

-यमाजी मालकर, ymalkar@gmail.com

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply