Breaking News

रविवारी खारघर मॅरेथॉन; व्यसनमुक्तीसाठी आबालवृद्ध धावणार!

पनवेल : रामप्रहर वृत्त
रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आणि खारघर रेसिडन्स वेल्फेअर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने व स्पर्धेचे सहआयोजक अदिम जाती मीना विकास असोसिएशनच्या सहकार्याने रविवारी (दि. 22) ’एक धाव व्यसनमुक्तीसाठी’ हे सामाजिक हिताचे घोषवाक्य घेऊन खारघर मॅरेथॉन 2023 होणार आहे.
खारघर सेक्टर 19मधील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल येथून या स्पर्धेला सकाळी 6 वाजता मान्यवरांच्या हस्ते झेंडा दाखवून सुरुवात होणार असून पारितोषिक वितरण सोहळाही त्याच ठिकाणी सकाळी 9 वाजता होणार आहे. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली होणार्‍या या मॅरेथॉनला प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माजी खासदार किरीट सोमय्या, पनवेल महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांची, तर प्रमुख मान्यवर म्हणून उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी, सुप्रसिद्ध बॉलीवूड हास्य अभिनेता राजपाल यादव, सिने अभिनेता व दिग्दर्शक आदिनाथ कोठारे, सिने अभिनेत्री सई मांजरेकर यांची उपस्थिती लाभणार आहे.
सामाजिक व शारीरिक हित जोपासले जात उत्कृष्ट व सुयोग्य नियोजन, तसेच वेगवेगळ्या सामाजिक संदेशासाठी प्रसिद्ध असलेल्या या स्पर्धेने लोकप्रियतेची शिखरे गाठली आहेत. यंदाची ही स्पर्धा 13वी असून पुरुष खुला गट 10 किलोमीटर अंतर, महिला खुला गट 10 किमी अंतर, 17 वर्षाखालील मुले गट 5 किमी अंतर, 17 वर्षाखालील मुली गट 5 किलोमीटर, 14 वर्षाखालील मुले गट 5 किमी अंतर, 14 वर्षाखालील मुली गट 5 किमी अंतर, तसेच खारघर दौड गट 3 किमी, सिनिअर सिटीझन दौड 2 किमी, पत्रकार गट 2 किमी अशा 13 गटांत स्पर्धा होणार आहे. विजेत्यांना दोन लाख 96 हजार रुपयांची बक्षिसे आहेत, तसेच स्पर्धा पूर्ण करणार्‍या प्रत्येक स्पर्धकाला आकर्षक मेडल देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे.
माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सन 2006 साली आणि रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचे सीईओ व मॅरेथॉन प्रमुख परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पनवेल मॅरेथॉनच्या अनुषंगाने या स्पर्धेला प्रारंभ झाला. त्यानंतर ही स्पर्धा खारघर शहरात घेण्यात आली. प्रथम आयोजनापासून ते आजपर्यंत उत्तम आणि दर्जेदार आयोजनामुळे ही स्पर्धा उत्तरोत्तर यशस्वी होत गेली. या अनुषंगाने या वर्षीच्या स्पर्धेत 17 हजारांहून अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदविला आहे.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply