Breaking News

मविआ सरकार गेंड्याच्या कातडीचे

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा घणाघात

पुणे : प्रतिनिधी
महाविकास आघाडी सरकारने सातत्याने वनवासी बांधवांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले आहे. या सरकारमुळे राज्यातील वनवासी बांधवांच्या आयुष्यात अनेक समस्या उभ्या ठाकल्या आहेत, पण राज्य सरकारने या समस्यांचे निराकरण करण्याकडे कानाडोळा केला आहे. कारण हे सरकार गेंड्याच्या कातडीचे आहे, असा घणाघात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी (दि. 23) भोसरी (पुणे) येथे केला. भाजप जनजाती मोर्चाच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत ते बोलत होते. पक्षातील नेते, पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.
नवीन सरकारमुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. सध्या राज्याच्या वसतिगृहातील अवस्था भीषण आहे. डीबीटीच्या माध्यमातून वनवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी पैसे जमा केले जातात, त्यातही गोंधळ सुरू आहे. काहींनी बनावट कागदपत्रांच्या आधारे शासकीय नोकर्‍यांचा लाभ मिळवला आहे, पण सरकारला याचा काहीही फरक पडत नाही. राज्यातील महाविकास आघाडी सरकार गेंड्याच्या कातडीचे आहे. त्यामुळे अशा सरकारला जागे करण्यासाठी आंदोलन उभारून सरकारचे लक्ष वेधले पाहिजे, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.
राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षाचे सरकार असताना वनवासी समाजाच्या विकासासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. त्यामध्ये प्रामुख्याने 25 हजार वनवासी विद्यार्थ्यांना चांगल्या शहरात शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून दिल्या. त्यांची सर्व फी आपण भरली. त्यासोबतच वनपट्टे वनवासी बांधवांना मिळवून दिले. त्यासाठीचा जो कायदा होता, त्याची प्रभावी अंमलबजावणी केली. या सर्व कामांची माहिती कार्यकर्त्यांनी समाजातील प्रत्येक घटकांपर्यंत पोहोचवली पाहिजे, असेही पाटील यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितलेे.
दरम्यान, भगवान बिरसा मुंडा यांची जयंती भारतीय जनता पक्षाच्या वतीने मोठ्या प्रमाणात साजरी केली जाईल तसेच पक्षाचे सर्व कार्यकर्ते मुंडा यांचे कार्य जनतेपर्यंत पोहोचवतील, अशी माहितीदेखील पाटील यांनी या वेळी दिली.

Check Also

रामबागचा वर्धापन दिन उत्साहात साजरा; मान्यवरांची उपस्थिती

पनवेल : रामप्रहर वृत्त महाराष्ट्राच्या सौंदर्यात भर टाकणार्‍या आणि लाखो निसर्गप्रेमींनी भेट दिलेल्या पनवेल तालुक्यातील …

Leave a Reply