Wednesday , February 8 2023
Breaking News

पनवेल-ठाणे एसी लोकलचा शुभारंभ

पनवेल : प्रतिनिधी
मध्य रेल्वेवरील पहिल्या एसी लोकलला पनवेलच्या महापौर डॉ. कविता चौतमोल यांनी गुरुवारी (दि. 30) दुपारी 3.30 वाजता हिरवा झेंडा दाखवला. पनवेलवरून ठाण्याला जाणार्‍या या गाडीसाठी खास महिला मोटरमन आणि महिला गार्डची नेमणूक करण्यात आली होती. या ऐतिहासिक क्षणी पनवेल स्टेशनवर प्रवाशांची गर्दी झाली होती.  
मध्य रेल्वेवर एसी लोकलसेवेचे आणि विविध सेवांचे उद्घाटन दिल्लीतून रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी व्हीडिओ लिंकद्वारे हिरवा झेंडा दाखवून केले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनन्सवरून रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांनी हिरवा झेंडा दाखवला आणि विविध स्टेशन्सवरील सेवांचे लोकार्पण केले. या कार्यक्रमास राज्यमंत्री आदिती तटकरे, खासदार अरविंद सावंत उपस्थित होते, तर पनवेल स्टेशनवर एसी लोकलला महापौर डॉ. कविता चौतमोल या हिरवा झेंडा दाखवताना प्रभाग समिती अध्यक्ष तेजस कांडपिळे, नगरसेवक अजय बहिरा, नगरसेविका चारुशीला घरत, दर्शना भोईर, राजश्री वावेकर, प्रवासी संघटनेचे डॉ. भक्तिकुमार दवे, श्रीकांत बापट, डॉ. मनीष बेहेरे, अश्वत्थामा ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी आणि रेल्वेचे अधिकारी उपस्थित होते.
पनवेल स्टेशनवर दुपारी 2 वाजताच एसी लोकलचे आगमन फलाट क्रमांक 4वर झाले. या वेळी प्रवासी संघटनेतर्फे महिला मोटरमन मनीषा म्हस्के आणि गार्ड श्वेता घोडे यांचा शाल, श्रीफळ देऊन नगरसेविका चारुशीला घरत यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

Check Also

लोकनेते दि. बा. पाटील यांच्या पुतळ्याचे अनावरण

पनवेल : वार्ताहर परमपूज्य स्वामी अक्षयानंद सरस्वती महाराज यांच्या प्रेरणेने अक्षयधाम मंदिराचा आठवा वर्धापन दिन …

Leave a Reply