Breaking News

अलिबाग किनारी एटीव्ही राईडसची अरेरावी

पत्रकाराला शिवीगाळ आणि धक्काबुक्की; गुन्हा दाखल

अलिबाग : प्रतिनिधी

अलिबाग समुद्रकिनार्‍यावर एटीव्ही राईडसची अरेरावी सुरू आहे. अलिबाग समुद्रकिनार्‍यावर शनिवारी (दि. 30) एटीव्ही राईडसला अपघात झाला. यात दोन महिला जखमी झाल्या. या अपघाताचे फोटो काढण्यासाठी गेलेल्या एका पत्रकाराला धक्काबुक्की करत तेथील व्यावसायिकांनी त्याच्या हातातील मोबाइल काढून घेतला व शिवीगाळ केली. या प्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे.

शनिवारी संध्याकाळी एका गाडीवरून फिरण्याचा आनंद घेत असताना गाडी उलटून दोन महिला जखमी झाल्या. अपघाताचे फोटो काढण्यासाठी गेलेल्या एका पत्रकाराला धक्काबुक्की करत तेथील व्यावसायिकांनी त्याच्या हातातील मोबाइल हिसकावून घेतला. पत्रकाराला झालेल्या शिवीगाळ, धक्काबुक्कीमुळे हे प्रकरण पोलीस ठाण्यात पोहचले. तेथे पोलिसांनी प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. पत्रकाराची तक्रार लिहून घेताना त्यात अपघाताचा उल्लेख येणार नाही याची काळजी घेतली. परंतु ही बाब पत्रकारांच्या लक्षात आल्यानंतर सविस्तर तक्रार देण्यात आली. त्यावरून अखेर  एटीव्ही व्यावसायिक मंदार पावशे व त्याच्या सहकार्‍यांविरोधात अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. रविवारी सकाळी अलिबाग समुद्रकिनारी सुरू असलेला एटीव्ही राईडसचा बेकायदा व्यवसाय बंद करण्यात आला.

जिल्ह्याच्या सर्वच प्रमुख किनार्‍यांवर बेकायदेशीरपणे एटीव्ही राईडस बिनबोभाटपणे चालवल्या जात आहेत. कायद्याचे उल्लंघन हा व्यावसाय सुरू आहे. अलिबागसह नागाव, काशिद, मुरूड , किहीम, दिवेआगर, श्रीवर्धन येथील किनार्‍यांवर शेकडोंच्या संख्येने एटीव्ही राइडस चालवल्या जातात. पर्यटकांसाठी हे आकर्षण ठरले आहे. यातून स्थानिकांना चांगला रोजगार उपलब्ध होत आहे. शिवाय पर्यटनातदेखील वाढ होते आहे.

एटीव्ही राईडसचा व्यवसाय करताना कुठल्याही प्रशासकीय यंत्रणेची परवानगी घेतली जात नाही. पूर्वी ही परवानगी मेरीटाइम बोर्डाकडून दिली जात असे. नंतर शासनाकडून हे अधिकार जिल्हा पातळीवर जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. परंतु जिल्हाधिकारी यांची परवानगी न घेताच हा व्यवसाय अनधिकृतपणे सुरू आहे.

वयस्कर व्यक्तींबरोबरच लहान मुलेदेखील या व्यवसायात उतरली आहेत. 12 ते 14 वर्षांची मुले येथे हा व्यवसाय करताना पहायला मिळतात. महत्त्वाचे म्हणजे इतक्या बेदरकारपणे वाळूत या गाड्या चालवतात की पर्यटकांना जीव मुठीत घेवून फिरावे लागते. अनेकदा छोटे मोठे अपघात होत असतात. शिवाय या गाड्यांच्या सायलेन्सरचा आवाज इतका कर्णकर्कश असतो की त्याने कानठळ्या बसून मोठ्या प्रमाणावर ध्वनीप्रदुषण होते. त्यावरदेखील कुणाचेही नियंत्रण नाही.

एटीव्ही राईडस ना परवानगी देण्याचे अधिकार पूर्वी मेरीटाइम बोर्डाकडे होते. परंतु काही वर्षांपूर्वी शासनाने नियम बदलून ते जिल्हाधिकारी यांना दिले. परंतु जिल्हाधिकारी यांच्या परवानगी विनाच एटीव्ही चालवल्या जातात. हे बेकायदा व्यवसाय बंद करावेत यासाठी आम्ही अनेकवेळा पोलिसांशी पत्रव्यवहार केला आहे.

-कॅ. सी. जे. लेपांडे, प्रादेशिक बंदर अधिकारी राजपुरी बंदरे समुह

Check Also

कोप्रोली येथे पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ

भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल : रामप्रहर वृत्त केंद्र सरकारची महत्त्वपूर्ण योजना …

Leave a Reply