Breaking News

रायगडावर राज्य सरकारचे दुर्लक्ष

मनसे नेते बाळा नांदगावकर यांचा आरोप

नागोठणे : प्रतिनिधी

रायगड जिल्ह्याला काही वर्षानंतर सुनील तटकरे यांच्या रूपाने खासदारपद मिळाले आहे. त्यांची कन्या सध्या राज्य मंत्रिमंडळात सुद्धा आहे. पक्षात आणि राज्य सरकारमध्ये त्यांचे वजन सुद्धा आहे. मात्र, रायगड जिल्ह्यात पैसे का येत नाहीत, नेतृत्व कुठे तरी कमी पडत असल्यामुळेच रायगडावर राज्य सरकारचे दुर्लक्षच होत असल्याचे मनसेचे नेते, माजी गृह राज्यमंत्री बाळा नांदगावकर यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी रविवारी (दि. 31) नागोठणे दौर्‍यात जिल्हा संघटक गोवर्धन पोलसांनी यांचे निवासस्थानी भेट दिली त्यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राज्य सरकारच्या सध्याच्या कारभारावर तुम्ही समाधानी आहात का, असा प्रश्न विचारला असता, राज्य सरकारकडून सर्वसामान्य माणसाला न्याय मिळत नसल्यामुळे ते कृष्णकुंजवर येवून आपले गार्‍हाणे मांडत असतात व आम्ही त्यांना निश्चितच न्याय देत असतो.

विकासाच्या मुद्द्यावर आम्ही लढतच असतो. मराठीचा सातबारा कायम राखलाच असे आमचे नेते राज ठाकरे यांचे म्हणणे असून त्याप्रमाणे आम्ही मनसैनिक त्यांच्या आदेशाचे कायम पालन करत आहोत. नागोठणे परिसरातील जेएसडब्ल्यू, जिंदाल या मोठ्या कंपन्यांमध्ये मराठी तरुणांना न्याय मिळत नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून दिले असता, मनसेच्या स्थानिक पदाधिकार्‍यांनी हा प्रश्न हातात घेतला पाहिजे. स्थानिक नेत्यांनी सर्वांची त्यासाठी मदत घेणे गरजेचे आहे. पास्को या कंपनीवर काढलेल्या मोर्चात मी स्वतः सहभागी झालो होतो असे त्यांनी सांगितले.

या वेळी गोवर्धन पोलसांनी नांदगावकरांचे मार्गदर्शनाखाली लवकरच येथील जिंदाल कंपनीच्या विरोधात लढा देणार असल्याचे जाहीर केले. सध्या आमचा पक्ष ’एकटा जीव सदाशिव’ म्हणून काम करीत आहे. आम्ही जाहीरपणे हिंदुत्व स्वीकारलेले आहे. त्यामुळे भविष्यात एकाच विचाराचे पक्ष आमच्या बरोबर आले तरी काहीही आश्चर्य वाटायला नको, असे नांदगावकर यांनी स्पष्ट केले.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply