आमदार भरत गोगावले यांचे प्रतिपादन


महाड : प्रतिनिधी
किल्ले रायगड संवर्धन आणि रायगड विभागाचा सर्वांगीण विकास केवळ शिवसेना, भाजप, आरपीआय युतीच्या सरकारनेच केला आहे. त्यामुळे नाते रायगड विभागातून महायुतीचे उमेदवार गीतेंना चार हजारचे मताधिक्य मिळणार असल्याचा विश्वास आमदार भरत गोगावले यांनी व्यक्त केला. तर पाकिस्तानला धडा शिकवायचा असेल तर मोदींना पंतप्रधान करा आणि त्यासाठी गीतेंना निवडून द्या, असे आवाहन भाजप लोकसभा मतदार संघ मिडीया सेल सहप्रमुख महेश शिंदे यांनी केले. महायुतीचे उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचारार्थ नाते (ता. महाड) विभागाची प्रचार सभा शुक्रवारी सायंकाळी चापगाव आणि पाचाड येथे आयोजित करण्यात आल्या होत्या. या प्रचार सभेत राष्ट्रवादीचे उमेदवार सुनिल तटकरे यांच्यावर आमदार गोगावले यांनी प्रखर टीका केली. काळ जलविद्युत प्रकल्प तटकरेमुळेच रखडला, त्यांनीच रायगड विभागाला पाणी टंचाईच्या खाईत ढकलले आहे. मात्र युतीच्या सरकारने या पाच वर्षात नाते रायगड विभागाचा विकास केला असून येथील मतदार अनंत गीते यांच्यामागे ठामपणे उभा आहे, असा विश्वास आमदार गोगावले यांनी व्यक्त केला. पाकिस्तानला धडा शिकवायचा असेल तर नरेंद्र मोदींनाच पंतप्रधान करा आणि त्यासाठी गीतेंना प्रचंड मतांनी विजयी करा, असे आवाहन करुन महेश शिंदे यांनी भाजप, सेना युतीच्या सरकारने महाड तालुक्यात केलेल्या विकासकामांचा पाढा वाचला. कामगारनेते उदय आंबोवणकर यांचेही या वेळी समयोचित भाषण झाले. राजीप माजी उपाध्यक्ष बाळकृष्ण राऊळ, संपर्क प्रमुख विजय सावंत, तालुका प्रमुख सुरेश महाडिक, भाजप तालुका उपाध्यक्ष चंद्रजीत पालांडे, रवींद्र तरडे, सभापती सपना मालुसरे यांनी गीते यांनी निवडून देण्याचे आवाहन केले.