पोलादपूर : प्रतिनिधी
लॉकडाऊन काळात केलेल्या सेवेनंतर आता पोलादपूर तालुक्यातील आरोग्य कर्मचार्यांना प्राधान्याने कोविशिल्ड लसीकरण करण्यात येणार असून, येथील ग्रामीण रूग्णालयामध्ये मंगळवारी (दि. 9) सकाळी आयुषचे डॉ. राजेश शिंदे यांना पहिली लस देण्यात आली. पहिल्या टप्प्यात पोलादपूर तालुक्यातील सुमारे 203 जणांना कोविशिल्ड लस देण्यात येणार असून, त्यात डॉक्टर, आरोग्य कर्मचारी आणि आशा सेविका यांचा समावेश करण्यात आला आहे. लसीकरणाचा पहिला डोस घेतल्यानंतर 28 व्या दिवशी पुन्हा दुसरा डोस दिला जाणार आहे. ग्रामीण रूग्णालयामध्ये या लसीकरणाला मंगळवारी सकाळी सुरूवात झाली त्यावेळी तहसिलदार दिप्ती देसाई, गटविकास अधिकारी धनंजय जगताप, राजिप सदस्य चंद्रकांत कळंबे, ग्रामीण रूग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षिका डॉ.भाग्यरेखा पाटील तसेच सामाजिक कार्यकर्ते सुनील मोरे यांच्यासह आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.