Breaking News

लॉकडाऊन, नैसर्गिक संकटाशी मुकाबला करीत गणेशमूर्ती रवाना

पेण : प्रतिनिधी
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यापासून सुरू असलेला लॉकडाऊन आणि त्यानंतर जून महिन्यात आलेल्या निसर्ग चक्रीवादळाच्या संकटावर मात करून पेणच्या सुप्रसिद्ध गणेशमूर्ती परदेशी निघाल्या आहेत.
प्रतिकूल परिस्थितीतही गणेश मूर्तिकारांनी हार न मानता नव्या जोमाने कामाला लागून पेण शहरातील विविध कलाकेंद्रांतून गणेशमूर्ती दुबई, थायलंड, इंडोनेशिया, मॉरिशियस येथे पाठविल्या आहेत. इंडोनेशिया व मॉरिशयसला बाप्पाच्या मूर्ती विमानाने गेल्या, तर दुबई व थायलंडला समुद्रमार्गाने पाठविण्यात आल्या, अशी माहिती कला केंद्राचे मालक नीलेश दीपक समेळ यांनी दिली.  
दरवर्षी पेण तालुक्यातून लंडन, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, दुबई, थायलंड, इंडोनेशिया, थिवी, मॉरिशयससह अनेक देशांमध्ये बाप्पांचे आगमन होते. लंडन, ऑस्ट्रेलिया, थिवी व अमेरिका येथे बाप्पांच्या मूर्ती कंटेनरमधून समुद्रमार्ग जहाजाने पाठवण्यात येतात. या प्रवासाला 45 ते 50 दिवस लागतात, मात्र यंदा लॉकडाऊनमुळे या देशांना बाप्पाची वारी होऊ शकली नाही.
यंदा उत्पादन घटण्याची चिन्हे
या वर्षी 30 लाख गणेशमूर्ती बनविण्याचा निश्चय पेण तालुक्यातील कारागिरांनी केला आहे. पेण शहरासह तालुक्यात 900 ते एक हजार गणेशमूर्ती कारखाने आहेत. या कार्यशाळांमधून सुमारे अडीच लाख कामगारांना रोजगार उपलब्ध होतो. हमरापूर, जोहे विभागातून मूर्ती बनवण्याकरिता लागणारा कच्चा मालही पुरवण्यात येतो. त्यामुळे पेणचे सुबक गणपती जगाच्या कानाकोपर्‍यात पोहोचतात, पण या वर्षी सुमारे 25 टक्के उत्पादन कमी होण्याची चिन्हे आहेत.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply