अलिबाग ः वार्ताहर
महाराष्ट्रातील शैक्षणिक क्षेत्रात आपल्या नावाचा ठसा उमटवणारे शिव छत्रपती पुरस्कार विजेते व तालुक्यातील सारळ माध्यमिक शाळेचे माजी मुख्याध्यापक देवेंद्र चौगुले यांचे गुरुवारी
(दि. 18) मुंबईत रुग्णालयात उपचारासमयी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. मृत्यूसमयी ते 77 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, नातवंडे असा परिवार आहे.
देवेंद्र चौगुले यांनी अलिबाग तालुक्यातील जनता शिक्षण मंडळाच्या सारळ माध्यमिक शाळेतून शैक्षणिक सेवेला सुरुवात केली. अनेक वर्षे उपमुख्याध्यापक म्हणून त्यांनी काम पाहिले. उत्तम क्रीडा शिक्षक आणि संस्कृतचे गाढे अभ्यासक म्हणून त्यांची वेगळी ओळख होती. त्यांना रायगड जिल्हा परिषदेचा व महाराष्ट्र शासनाचा आदर्श पुरस्कार देऊन गौरवण्यात आले होते. ते रायगड जिल्हा शिक्षक संघटनेचे अध्यक्षही होते.