खांदा कॉलनीतील महिलांचा आक्रमक पवित्रा
कळंबोली : प्रतिनिधी
पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील सिडको वसाहतीतील खांदा कॉलनी वसाहतीतील पाण्याचा प्रश्न पेटला असून गेली महिन्यांपासून सेक्टर 12 व सेक्टर 7 मधील रहिवासींना कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने रात्री जागून हंडाभर पाणी मिळवावे लागत आहे तर काहींना पाणी विकत घ्यावे लागत आहे. त्यामुळे त्रस्त झालेल्या महिलांनी सिडकोच्या अधिकार्यांना घेराव घातला. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व सिडको प्रशासनाच्या दिशाहीन व्यवस्थापनामुळे अनेक वसाहतीमध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. एमजीपीच्या पाणीपुरवठा करणार्या पाईपलाईनला गळती लागली आहे तर काही ठिकाणी बिल्डर माफिया आणि तथाकथित समाजसेवकांनी सिडकोच्या खांदा कॉलनी, नवीन पनवेल कळंबोली पाईपलाईन तोडून पाणी चोरून विकण्याचा, मोफत वाटण्याचा बिनभांडवली धंदा सिडको अधिकार्यांच्या मर्जीने सुरू केल्याची चर्चा सुरू झाली आहे. याचा त्रास रहिवासीयांना सहन करावा लागत आहे. खांदा कॉलनी मधील सेक्टर 7 मध्ये गेली महिन्यांपासून कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने महिला वर्गाला पहाटे 4 वाजेपर्यंत जागून पाणी भरावे लागत आहे. त्यामुळे नागरिकांत तीव्र नाराजी पसरली आहे. तर सेक्टर 12 मध्ये पुरवठा कमी दाबाने झाल्यामुळे गेली चार-पाच दिवस येथील रहिवाशांना पाणीच मिळाले नाही, त्यामुळे त्रस्त झालेल्या माता भगिनीने व सोसायटीच्या पदाधिकारी व नागरीकांनी सिडकोचे कनिष्ठ अभियंता राहुल सरोदे यांच्या कार्यालयात मोर्चा नेऊन आपली पाण्याची समस्या सांगितली. तसेच लवकरात लवकर त्यावर योग्यप्रकारे उपाययोजना करण्यात यावी नपेक्षा नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल असा इशारा दिला. या वेळी माजी उपनगराध्यक्ष गणेश पाटील यांच्यासह खांदा कॉलनीतील मोठ्यासंख्येने महिला वर्ग उपस्थित होता.