Breaking News

डुंगी गावाचेही होणार पुनर्वसन ; सिडकोच्या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद

पनवेल : बातमीदार

प्रस्तावित नवी मुंबई विमानतळ प्रकल्पांतर्गत पुनर्वसन करण्यास सुरुवातीला नकार दिलेल्या डुंगी गावाचेही पुनर्वसन करण्याचा प्रस्ताव सिडकोने मान्य केला आहे. विमानतळासाठी विस्थापित केलेल्या अन्य 10 गावांतील प्रकल्पग्रस्तांप्रमाणे डुंगी गावातील ग्रामस्थांना प्रत्येक घरासाठी तिप्पट बांधकाम खर्च देण्याचा निर्णय घेण्यात आला. सोमवारी सिडको भवनात झालेल्या बैठकीत डुंगी गावातील रहिवाशांनी सिडकोच्या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

मागील वर्षभरापासून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भरावाचे काम मोठ्या वेगाने सुरू आहे. पुढील 10 दिवसांत गाढी नदी वळविण्याचे काम संपुष्टात येत असल्याचा दावा सिडको करते आहे. विमानतळाला लागून असलेल्या पारगाव ग्रामपंचायत हद्दीतील डुंगी गावाचे पुनर्वसन करण्यात येणार नव्हते. डुंगी गावाच्या अगदी लगत करण्यात आलेल्या विमानतळाच्या भरावामुळे गावापेक्षा भराव उंचीवर गेला आहे. भरावानंतर झालेल्या पहिल्याच पावसात गावात पाणी शिरल्यामुळे भविष्यात काय परिस्थिती उद्भवेल, या भीतीने ग्रामस्थ चिंतेत होते.

यंदाचा पावसाळा येण्याची चाहूल लागताच महसूल विभागाने आपत्ती व्यवस्थापनांतर्गत ग्रामस्थांना पावसाळ्यापुरते गावाचे स्थलांतर करा, असा प्रस्ताव ठेवला, मात्र याला विरोध करीत सिडकोशी चर्चा सुरू असल्याचे सांगण्यात आले. सोमवारी सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली सिडको भवनात झालेल्या बैठकीत अखेर डुंगी गावचे पुनर्वसन करण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले. डुंगी गावाच्या शेतकर्‍यांची जमीन यापूर्वीच विमानतळात संपादित झाल्यामुळे ते प्रकल्पग्रस्त आहेत, मात्र गाव विस्थापित करण्यात ग्रामस्थांनी विरोध केला होता, मात्र विमानतळाच्या भरावामुळे गाव खड्ड्यात आणि विमानतळ उंचावर अशी परिस्थिती आल्यामुळे ग्रामस्थांनी सिडकोकडे गावाचे पुनर्वसन करण्याचा तगादा लावला होता.

सोमवारी झालेल्या बैठकीत अन्य विमानतळ प्रकल्पग्रस्तांप्रमाणे प्रत्येक घराला तीनपट बांधकाम खर्च, घर बांधण्यासाठी जमीन देण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला गावातील अनेक नागरिक उपस्थित होते. सिडकोच्या या प्रस्तावाला डुंगी गावातील नागरिकांनी एकमताने सहमती दर्शविली आहे. गावाची लोकसंख्या सुमारे साडेचारशे इतकी असून गावात 60 घरे आहेत. या सर्वांचे पुनर्वसन करण्यात येणार असल्यामुळे सिडकोच्या नियोजनाप्रमाणे डुंगी गावाच्या बाजूला होल्डिंग पॉण्ड बांधण्यात येणार होता. आता हा होल्डिंग पॉण्ड डुंगी गावासह बांधून होल्डिंग पॉण्डची क्षमता वाढविता येईल, अशी चर्चा सिडकोत सुरू झाली आहे.

  • पावसाळ्यात भाडे

पावसाळ्यात गावात पाणी शिरून नुकसान होऊ नये म्हणून ग्रामस्थांनी आताच घरे स्थलांतरित करून भाडेतत्त्वावर इतर ठिकाणी राहायला जाण्याचा सिडकोचा प्रस्ताव आहे. पावसाळ्यापुरते भाडे देण्यास सिडकोने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

— डुंगी गावच्या सुरक्षेच्या दृष्टीने सिडकोने हा निर्णय घेतला आहे. पावसाळ्यात जीव मुठीत घेऊन राहणार्‍या ग्रामस्थांना सिडकोकडून दुसरीकडे हक्काचे घर बांधण्यासाठी जागा दिली जाईल. अन्य प्रकल्पग्रस्तांप्रमाणे मोबदला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

-आमदार प्रशांत ठाकूर, अध्यक्ष, सिडको

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply