पनवेल ः वार्ताहर
पनवेलजवळील युसूफ मेहेरअली सेंटरच्या मधू-प्रमिला दंडवते संकुल बांधनवाडी पो. बारापाडा येथे एसबीआय लंच ग्रुप मुंबईमधील सदस्याने आपले दिवंगत बंधू ’प्रेम’ यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ केलेल्या मदतीतून विटा व आरसीसी बांधकामाच्या तुलनेत अत्यल्प खर्चात होणार्या फेरोसिमेंट पद्धतीने बांधण्यात आलेल्या 11 हजार लिटर साठवण क्षमता असलेल्या पावसाळी पाणी साठवण टाकीचे लोकार्पण करण्यात आले.
युसूफ मेहेरअली सेंटरच्या रिटा श्रीधर, जलवर्धिनी प्रतिष्ठानचे चेअरमन उल्हास परांजपे, प्रकल्प संचालक सुरेश रासम, बाळकृष्ण सावंत, चंद्रमोहन नायर, सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर, पॅनासोनिक कंपनीचे सीएसआर प्रमुख कर्णिक, माजी उपसरपंच विद्याधर जोशी, ग्रामसंवर्धन सामाजिक संस्थेचे उदय गावंड, दिनेश पाटील, चंद्रकांत पाटील, जितेंद्र पाटील, कल्पेश ठाणगे, मालती म्हात्रे, निर्मला नायर आदी या वेळी उपस्थित होते.
फेरोसिमेंट टेक्नॉलॉजी ही पर्यावरणपूरक असून या पद्धतीने दुष्काळी भागात पाघोळी विहीर, घरे, शौचालय तसेच संरक्षक भिंती किंवा फार्मचे कुंपण करता येते. हे बांधकाम कुशल व अकुशल मजुरांच्या मदतीने होऊ शकते, ज्यामुळे ग्रामीण मजुरांच्या हाताला काम मिळेल, असे या वेळी उल्हास परांजपे यांनी सांगितले.