Breaking News

जोकोव्हिच, सेरेना चौथ्या फेरीत

सिडनी : वृत्तसंस्था
गतविजेता नोव्हाक जोकोव्हिच आणि तिसर्‍या मानांकित डॉमिनिक थीम यांनी संघर्षपूणे खेळीने ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेची चौथी फेरी गाठली. दुसरीकडे अलेक्झांडर झ्वेरेव्ह, सिमोना हॅलेप, सेरेना विल्यम्स यांनी आपापले सामने जिंकत चौथ्या फेरीतील आपले स्थान निश्चित केले.
अग्रमानांकित नोव्हाक जोकोव्हिचने अमेरिकेच्या टेलर फ्रिट्झविरुद्ध पहिले दोन सेट जिंकून शानदार सुरुवात केली, मात्र फ्रिट्झने पुढील दोन सेट जिंकून जोकोव्हिचला जशास तसे उत्तर दिले. अखेर पाचव्या सेटमध्ये दोन वेळा फ्रिट्झची सर्व्हिस भेदत जोकोव्हिचने विजय संपादन केला. त्याने हा सामना 7-6 (7/1), 6-4, 3-6, 4-6, 6-2 असा जिंकला.
पहिले दोन सेट गमावल्यानंतरही तिसर्‍या मानांकित डॉमिनिक थीम याने जोमाने पुनरागमन करीत पुढील तिन्ही सेट जिंकून आगेकूच केली. अमेरिकन ग्रँडस्लॅम विजेत्या थीमने ऑस्ट्रेलियाच्या निक किर्गिस याला 4-6, 4-6, 6-3, 6-4, 6-4 असे पराभूत करीत चौथी फेरी गाठली. सहाव्या मानांकित अलेक्झांडर झ्वेरेव्ह याने फ्रान्सच्या एड्रियन मॅन्नारिनो याचा अवघ्या एक तास 43 मिनिटांत 6-3, 6-3, 6-1 असा फडशा पाडत चौथ्या फेरीत मजल मारली.
रोमानियाच्या दुसर्‍या मानांकित सिमोना हॅलेप हिनेही रशियाच्या वेरोनिका कुडेरमेटोव्हा हिचा एक तास 18 मिनिटे रंगलेल्या लढतीत 6-1, 6-3 असा फडशा पाडत चौथ्या फेरीत प्रवेश केला.
10व्या मानांकित अमेरिकेच्या सेरेना विल्यम्स हिला विजयासाठी झगडावे लागले तरी तिने चौथ्या फेरीत आपले स्थान निश्चित केले. 23 ग्रँडस्लॅम विजेत्या सेरेनाने अ‍ॅनास्तेशिया पोटापोव्हा हिचे आव्हान 7-6 (7/5), 6-2 असे परतवून लावले. बेलारूसच्या सातव्या मानांकित आर्यना साबालेंका हिने अमेरिकेच्या अ‍ॅन ली हिला 6-3, 6-1 असे सहज पराभूत केले.
जपानच्या नाओमी ओसाका हिने ट्युनेशियाच्या 27व्या मानांकित ओन्स जबेऊर हिला 6-3, 6-2 अशी सहज धूळ चारली. स्पेनच्या गार्बिन मुगुरुझाने कझाकस्तानच्या झरिना दियास हिच्यावर 6-1, 6-1 असा सहज विजय मिळवला.
ऑस्ट्रेलियाच्या बार्टीची दुहेरीतून माघार
जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असलेली ऑस्ट्रेलियाची अ‍ॅश्ले बार्टी हिने मांडीच्या स्नायूंच्या दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या दुहेरीतून माघार घेतली आहे. महिला एकेरीच्या दुसर्‍या फेरीत ऑस्ट्रेलियाच्या दारिया गोवरिलोव्हाविरुद्ध खेळताना तिला दुखापतीचा त्रास होत होता. महिला दुहेरीत ती अमेरिकेच्या जेनिफर ब्रॅडीसह खेळणार होती, पण दुसर्‍या फेरीतून माघार घेतल्याने एलिस मेर्टेन्स आणि आर्यना साबालेंका यांना पुढे चाल देण्यात आली. दुसरीकडे अमेरिकेच्या टेलर फ्रिट्झविरुद्ध पाच सेटपर्यंत रंगलेल्या सामन्यात कोर्टवर पडल्यानंतर अग्रमानांकित नोव्हाक जोकोव्हिचच्या पायाचे स्नायू ताणले गेले आहेत. त्यामुळे तो ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेतून माघार घेण्याची शक्यता आहे. 

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply