मुंबई : प्रतिनिधी
राज्यात महावितरणकडून शेतकरी व घरगुती वीज ग्राहकांवर करण्यात येत असलेल्या कारवाईच्या निषेधार्थ 24 फेब्रवारी रोजी भाजपकडून राज्यभरात 287 ठिकाणी जेलभरो आंदोलन केले जाणार आहे, अशी घोषणा माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी (दि. 17) पत्रकार परिषदेत केली. भाजप प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्कार परिषदेत ते बोलत होते. भाजप प्रदेश उपाध्यक्ष व माध्यम विभाग प्रभारी माधव भांडारी, मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, माध्यम विभाग प्रमुख विश्वास पाठक सोबत उपस्थित होते.
बावनकुळे म्हणाले की, महाराष्ट्रात वीज विभागाकडून शेतकर्यांची व घरगुती वीज तोडण्याचा प्रकार तोही दमदाटी करून व पोलिसांच्या बळाचा वापर करून सुरू आहे. महाराष्ट्रात यापूर्वी या मोगलशाही पद्धतीने कारभार केला गेला नाही, मात्र असे काम मागील आठ ते पंधरा दिवसांपासून सुरू झाले आहे.
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना पाच वर्षे शेतकर्यांचे वीज कनेक्शन तसेच 45 लाख शेतकर्यांचे 28 हजार कोटी थकीत झाल्यावरही एकाही शेतकर्याचे वीज कनेक्शन आम्ही कापले नाही, पण या सरकारने शेतकर्यांचे वीज कनेक्शन कापणे सुरू केले आहे. आज पिकांना पाण्याची गरज असताना संपूर्ण राज्यात वीज तोडणी करण्याचा निर्णय या सरकारने घेतला आहे. त्यामुळे शेतकर्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. शेतकरी आत्महत्येकडे वळतील अशी कृती महाराष्ट्र सरकारकडून सुरू आहे. राज्यातील तीन कोटी लोकांना अंधारात आणण्याचा सरकारकडून प्रयत्न होत आहे. या सरकारला आज आम्ही शेवटची विनंती करतो आहे, असा इशारा बावनकुळे या वेळी दिला.
वीजप्रश्नी ज्यांच्यावर अन्याय झाला आहे अशा शेतकरी व नागरिकांकडे आम्ही जाणार आहोत व 23 फेब्रुवारीपर्यंत त्यांच्या स्वाक्षरीनिशी निवदने घेणार आहोत. त्यानंतर राज्यात 24 फेब्रुवारी रोजी जेलभरो आंदोलन 287 ठिकाणी होणार आहे. यासाठी सर्व आमदार, खासदार व प्रमुख नेत्यांना जबाबदारी देण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात आतापर्यंत जेवढे तीव्र आंदोलन झाले नाही, तेवढे तीव्र आंदोलन हे होणार आहे. जेलभरो आंदोलनाच्या माध्यमातून सरकारसमोर हा असंतोष आम्ही मांडणार आहोत, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.
Check Also
अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा
आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …